Mon, Sep 28, 2020 08:39होमपेज › Vidarbha › अव्वाच्या सव्वा बिल आकारणाऱ्या रुग्णालयाला तुकाराम मुंढे यांचा मोठा दणका

अव्वाच्या सव्वा बिल आकारणाऱ्या रुग्णालयाला तुकाराम मुंढे यांचा मोठा दणका

Last Updated: Aug 18 2020 1:38AM

मनपा आयुक्त तुकाराम मुंढेनागपूर : पुढारी वृत्तसेवा 

राज्य शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा रुग्णांकडून अधिक दराने बिल वसुली करणाऱ्या आणि दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर नागपूर मनपाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

वोक्हार्ट रुग्णालयावरील दंडात्मक कारवाईनंतर आता जगनाडे चौकातील सेव्हन स्टार रुग्णालयाला कारवाईचा दणका बसला. रुग्णालयातील अनियमितता आणि हलगर्जीपणा करणाऱ्या सेव्हन स्टार रुग्णालयाला पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला तर रुग्णांकडून अधिक पैसे उकळल्याचा ठपका ठेवत सुमारे ६.८६ लाख रुपये तात्काळ परत करण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यंनी दिले.

शहरातील विविध खासगी रुग्णालये कोविड आणि नॉन कोविड रुग्णांकडून शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार रक्कम न घेता अधिक रक्कम घेत असल्याच्या तक्रारी होत्या. यासाठी मनपाने अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांच्या नेतृत्वातील एका पथकाचे गठन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून हे पथक शहरातील कुठल्याही रुग्णालयात जाऊन आकस्मिक तपासणी करत होते. यात सेव्हन स्टार रुग्णालयामध्ये अनेक अनियमितता आढळून आल्याचे निदर्शनास आले. नॉन कोविड रुग्णांकडून अनेक तपासण्यांचे पैसे उकळण्यात आल्याचेही निष्पन्न झाले. यासंदर्भात ११ ऑगस्ट रोजी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, अशा प्रकारची नोटीस मिळाली नसल्याचे रुग्णालयाने उत्तरात म्हटले होते.

नियमांचे पालन न करणे, नोटिशीला समाधानकारक उत्तर न देणे आणि निर्धारीत दरापेक्षा रुग्णांकडून अधिक रक्कम आकारल्याप्रकरणी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पाच लाख रुपयांचा दंड सेव्हन स्टार रुग्णालयावर ठोठावला. दंडाची ही रक्कम तीन दिवसांच्या आत जमा करण्याचे निर्देश देण्यात आले. यासोबतच १७ रुग्णांचे अतिरिक्त वसूल केलेले ६.८६ लाख रुपये सुद्धा तीन दिवसांच्या आत परत करण्याचे निर्देश देण्यात आले.
 

 "