Wed, May 19, 2021 04:46
भंडारा : विजेच्या धक्क्याने कंत्राटी कामगाराचा मृत्यू

Last Updated: May 04 2021 7:54PM

भंडारा : पुढारी वृत्तसेवा

वीज तारांवर काम करताना अचानक ११ के. व्ही. वाहिनीला स्पर्श झाल्याने वीज कामगार भाजला. उपचारादरम्यान नागपूर येथील शासकीय रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. दीपक सुखदेव झिंगरे (२५) रा. खैरी/ पिंपळगाव तालुका लाखनी असे मृत कामगाराचे नाव आहे. ही घटना ३  मे रोजी  दुपारी निमगाव (पालांदूर) येथे घडली.

दीपक हा कंत्राटी कामगार म्हणून वीज विभागात कार्यरत होता. वीज वाहिनीवर काम करीत असताना विद्युत प्रवाह बंद होता. परंतु त्याच्यावर ११ के. व्ही. ची वीज वाहिनी असल्याचे त्याच्या लक्षात न आल्याने व त्यावर वीज प्रवाह सुरू असल्याने ही घटना घडली.

घटनेनंतर लगेच त्याला ग्रामीण रुग्णालय पालांदूर येथे दाखल करण्यात आले. यानंतर पुढील उपचारासाठी भंडारा येथे रेफर करण्यात आले. मात्र कोरोनाच्या संकटाने तेथील जळीत  उपचार वॉर्ड बंद असल्याने नागपूर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.