Tue, Sep 29, 2020 19:04होमपेज › Vidarbha › अजित पवार, सुनील तटकरे अडचणीत

अजित पवार, सुनील तटकरे अडचणीत

Published On: Dec 13 2017 2:01AM | Last Updated: Dec 13 2017 2:01AM

बुकमार्क करा

नागपूर : वृत्तसंस्था

नागपूरमध्ये एकीकडे शरद पवार व गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखाली भव्य जनआक्रोश मोर्चा निघाला असताना दुसरीकडे सिंचन घोटाळ्या प्रकरणी 4 गुन्हे दाखल झाले आहेत. गोसीखुर्द सिंचन प्रकल्पातील घोटाळ्याप्रकरणी हे गुन्हे दाखल झाले असून यामुळे अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.

वैनगंगा नदीवर असलेल्या गोसीखुर्द धरणातून नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील सुमारे 2 लाख 50 हजार 800 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. या भागातील जनता 30 वर्षांपासून जास्त काळ शेतीला पाणी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले होते. राज्यातील सिंचन घोटाळ्यात गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाचाही समावेश होता. सिंचन प्रकल्पांमधील गैरव्यवहारावरुन भाजपने विरोधी पक्षात रान उठवले होते. यावरुन त्यांनी आघाडी सरकारची कोंडी देखील केली होती. सत्तेवर आल्यावर कोकणातील सिंचन प्रकल्पांची चौकशी पुढे सरकली होती. 

काही अधिकार्‍यांविरोधात गुन्हे देखील झाले होते. मात्र, विदर्भातील प्रकल्पाबाबत संथगतीने चौकशी सुरु होती. अखेर मंगळवारी नागपूरमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चार गुन्हे दाखल केले आहे. आरोपींमध्ये नेमका कोणाचा समावेश आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही.

आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीला हादरा देण्यासाठीच ही कारवाई केली की काय अशी चर्चा आता दबक्या आवाजात सुरु आहे. विशेष म्हणजे विदर्भातील सिंचन प्रकल्पांच्या कामांच्या निविदा तत्कालीन सरकारच्या काळात देण्यात आल्या असल्या तरी त्यापैकी गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाची कामे भाजपचे खासदार आणि आमदारांच्या कंपन्यांनी केली आहेत. 

एसीबीने या घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांची काही दिवसांपूर्वी चौकशी केली होती. अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी क्लीन चिट दिलेली नाही, असे उत्तर एसीबीने अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीला दिले होते. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांचीही चौकशी लाचलुचपत विभागाने केली होती.

वाचा : काय आहे विदर्भ सिंचन घोटाळा?