Mon, Jan 18, 2021 19:24




नागपूर विभागासाठी १ लाख १४ हजार कोव्हिशील्ड लसीचे डोस दाखल

Last Updated: Jan 14 2021 6:02PM




नागपूर : पुढारी वृत्तसेवा 

कोरोना विषाणू प्रतिबंधक लस मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात विभागातील फ्रंट लाईन वॉरियरांची नोंदणी ९३ हजार ३०९ झाली आहे. यात शासकीय व खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश असून यांच्यासाठी सीरम इन्स्टिट्यूट येथून १ लाख १४ हजार कोव्हिशील्ड लसीचे डोसेस प्राप्त झाले आहेत. विभागातील ३४ केंद्रांवरुन कोव्हिशील्ड लसीचे डोस देण्यात येणार असून याबाबतची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल यांनी आज (दि.१४) दिली.

कोरोनावरील लसीकरणासाठी कोव्हिशील्ड ही लस आज पहाटे नागपूर येथे पोहचली. ती आज सकाळी सर्व जिल्ह्यांसाठी विशेष शितगृह असलेल्या वाहनाने रवाना करण्यात आली आहे.  विभागात ३४ केंद्रांद्वारे १६ जानेवारीपासून नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे. आरोग्य विभागातर्फे लसीकरण मोहिमेसाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून प्रत्यक्ष लसीकरणासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये ड्राय रन आयोजित करुन लसीकरणाची पूर्वतयारी झाली आहे. प्रत्येक केंद्रावर दररोज सरासरी शंभर आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे नियोजन आहे.

प्राप्त १ लाख १४ हजार डोसचे जिल्हानिहाय वितरित 

भंडारा : ९ हजार ५००
चंद्रपूर : २० हजार 
गडचिरोली : १२ हजार 
गोंदिया : १० हजार, 
नागपूर : ४२ हजार 
वर्धा : २० हजार ५०० 

लसीकरणासाठी जिल्हानिहाय यंत्रणा सज्ज झाली असून ३४ केंद्रांवर प्रत्यक्ष लसीकरण करण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यातील १२ केंद्र राहणार आहेत. यामध्ये नागपूर महानगर क्षेत्रातील पाच तर ग्रामीण क्षेत्रातील सात केंद्रांचा समावेश आहे. शहरातील पाच केंद्रांमध्ये डागा माहिला रुग्णालय, एम्स, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व महाल येथील डायग्नोसिस सेंटर येथे लसीकरण करण्यात येईल. तर जिल्ह्यातील केंद्रामध्ये उपजिल्हा रुग्णालय रामटेक, कामठी, ग्रामीण रुग्णालय उमरेड, हिंगणा, काटोल, सावनेर, प्राथमिक आरोग्य केंद्र, गोंडखैरीचा समावेश आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील सहा केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर उपजिल्हा रुग्णालय वरोरा व राजुरा, ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी, नागरी रुग्णालय रामनगर तसेच पठाणपुराचा समावेश आहे.

गोंदिया जिल्ह्यातील तीन केंद्रांवर लसीकरण होणार असून यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया, उपजिल्हा रुग्णालय तिरोडा व ग्रामीण रुग्णालय देवरी

वर्धा जिल्ह्यातील सहा केंद्रांवर लसीकरण होणार असून यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय सेवाग्राम, दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालय सावंगी, जिल्हा रुग्णालय वर्धा, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट, आर्वी, ग्रामीण रुग्णालय सेलू यांचा समावेश आहे. 

भंडारा जिल्ह्यातील तीन केंद्रांवर लसीकरण होणार असून यामध्ये जिल्हा रुग्णालय भंडारा, उपजिल्हा रुग्णालय तुमसर व ग्रामीण रुग्णालय लाखनी यांचा समावेश आहे.
९३ हजार ३०९ आरोग्य सेवकांची नोंदणी

कोरोना काळात प्रत्यक्ष सेवा देणाऱ्या शासकीय व खासगी रुग्णालयातील आरोग्य सेवकांची नोंदणी करण्यात आली असून, विभागात ९३ हजार ३०९ आरोग्यसेवकांचा समावेश आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना कोव्हिशील्डचा पहिला डोस प्राधान्याने देण्यात येत आहे.

नोंदणी झालेल्या जिल्हानिहाय आरोग्य सेवकांमध्ये नागपूर शहरातील २५ हजार १६४ तर नागपूर ग्रामीण भागातील ९ हजार १६९ अशा ३४ हजार ३३३ जणांचा समावेश आहे. 

वर्धा जिल्ह्यातील १६ हजार ७५४, भंडारा ७ हजार ६०२, चंद्रपूर १६ हजार ११०, गडचिरोली ९ हजार ९४७ तर गोंदिया जिल्ह्यातील ८ हजार ५६३ आरोग्यसेवकांची नोंदणी झाली आहे.