Mon, Sep 28, 2020 06:56होमपेज › Sports › मैदानावर धोनीचा जयघोष; विराट काय म्हणाला?

मैदानावर धोनीचा जयघोष; विराट काय म्हणाला?

Last Updated: Dec 10 2019 1:30AM
पुढारी ऑनलाईन डेस्क 

वेस्ट इंडीजने दुसऱ्या टी- 20 सामन्यात भारताचा पराभव करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या सामन्यात भारताने 170 अशी समाधानकारक संख्या उभारली, तरी ती डिफेन्ड करता आली नाही. भारताच्या या पराभवाचे एक प्रमुख कारण म्हणजे गचाळ क्षेत्ररक्षण राहिले.

विशेष म्हणजे ज्या लेंडल सिमन्स आणि एव्हिन लुईस यांचे वॉशिंग्टन सुंदर आणि ऋषभ पंतने झेल सोडले त्यामुळे विंडीजचा विजय सुकर झाला. ज्यावेळी पंतने झेल सोडला त्यावेळी मैदानात असलेल्या प्रेक्षकांनी एम. एस....एम. एस. अशी घोषणाबाजी सुरु केली. पण, हे भारताचा कर्णधार विराट कोहलीला रुचले नाही. त्याने प्रेक्षकांना हे काय चाललयं? विचारणा केली.

थिरुवअनंतपूरम येथील दुसरा टी -20 सामना सुरु होण्यापूर्वीच शहरात माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची पोस्टर्स लागली होती. त्यानंतर ज्यावेळी ऋषभ पंतचा पर्याय असलेला लोकल बॉय संजू सॅमसन सरावाला आला त्यावेळीही त्याच्या नावाची घोषणाबाजी झाली होती. त्यामुळे या सामन्यात पंतवर चांगली कामगिरी करण्याचे दडपण होते. त्याने फलंदाजी करताना 22 चेंडूत 33 धावांची उपयुक्त खेळी केलीही. पण, त्याने एव्हिन लुईसचा झेल सोडला आणि प्रेक्षकांनी धोनीच्या नावाची घोषणा देण्यास सुरुवात केली. 

कर्णधार विराट कोहलीने सामन्यापूर्वीच पंत चुकल्यानंतर धोनीच्या नावाच्या घोषणा देणे बरोबर नसल्याचे वक्तव्य केले होते. पण, या सामन्यात पुन्हा धोनीच्या नावाची घोषणा झाल्याने त्याने प्रेक्षकांकडे वळत हे काय चाललयं? असे विचारत नाराजी व्यक्त केली. विराटने प्रेक्षकांना सुचना किंवा नाराजी व्यक्त करण्याची ही पहिली वेळ नाही. त्याने वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात स्टिव्ह स्मिथवर शेरेबाजी करणाऱ्या प्रेक्षकांनाही शांत राहण्यास सांगितले होते. त्यावेळी त्याच्या या कृतीची क्रीडा वर्तुळातून कौतुक झाले होते.  

 "