Tue, Sep 29, 2020 18:54होमपेज › Sports › #2019 विराटच्या धोनी प्रेमाचीच सर्वाधिक चर्चा

#2019 विराटच्या धोनी प्रेमाचीच सर्वाधिक चर्चा

Last Updated: Dec 10 2019 9:01PM
पुढारी ऑनलाईन डेस्क 

भारताच्या दृष्टीने सरते 2019 हे वर्ष तसे विशेष आणि दूरगामी परिणाम करणारे ठरले. राजकीय दृष्ट्या जशा ऐतिहासिक 2019 च्या निवडणुका होणार होत्या तशाच क्रीडा वर्तुळात इंग्लंडचा वर्ल्डकपही होणार होता. या वर्ल्डकपनंतरच भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने क्रिकेटच्या मैदानापासून फारकत घेतली. त्याने निवृत्ती घेतली की तो ब्रेक घेऊन परतणार आहे याबाबत कोणतीही स्पष्टता झाली नाही. या सर्व पार्श्वभुमीवर भारताचा कर्णधार विराट कोहलीने धोनीच्या वाढदिनादिवशी ट्विट करत त्याच्याबद्दलचे प्रेम आणि आदर व्यक्त केला होता. हेच ट्विट 2019 वर्षातील सर्वाधिक रिट्विट झालेले ट्विट असल्याचे ट्विटर इंडियाने जाहीर केले. 

ट्विटर इंडियाने 2019 मध्ये भारतात ट्विटरवर कोणकोणत्या ट्विटने सर्वाधिक लक्ष वेधून घेतले याबाबत माहिती दिली. त्यांनी राजकारण, कला आणि क्रीडा क्षेत्रातील लक्षवेधी ट्विट जाहीर केले आहेत. यातील विराटने धोनाच्या वाढदिवसादिवशी केलेल्या विशेष ट्विटने क्रीडा जगतातील सर्वाधिक रिट्विट झालेले ट्विट हा मान पटकावला आहे. विराटने ' वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माही भाई. फार कमी लोकांना विश्वास आणि आदर याचा अर्थ समजतो आणि तुझ्यासोबत बऱ्यावर्षापासून असलेल्या मैत्रीचा मला आनंद आहे. तू आमच्या सर्वांसाठी मोठा भाऊ आहेस आणि मी या आधीही सांगितले आहे की तू माझा कायम कर्णधार असशील.' असे ट्विट केले होते. 

हे ट्विट भारतीय क्रीडा जगतातील सर्वाधिक रिट्विट झालेले ट्विट ठरले. जवळपास 45 हजाराच्या वर लोकांनी हे ट्विट रिट्विट केले. तर जवळपास 4 लाख 20 हजार लोकांनी हे ट्विट लाईक केले. 

याचबरोबर ट्विटर इंडियाने भारतातील क्रीडा जगतात कोणत्या पुरुष आणि महिला खेळाडू ट्विटर हँडल सर्वश्रेष्ठ ठरले हेही जाहीर केले. पुरुष खेळाडूंच्या टॉप ट्विटर हँडलमध्ये विराट कोहली अव्वल आहे. त्यानंतर महेंद्रसिंह धोनीचा नंबर लागला. तिसऱ्या क्रमांकावर आर. अश्विन, चौथ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर, पाचव्या स्थानावर विरेंद्र सेहवाग, सहाव्या स्थानावर हरभजन सिंग, सातव्या स्थानावर युवराज सिंग, आठव्या स्थानावर हार्दिक पांड्या, नवव्या स्थानावर रविंद्र जडेजा आणि दहाव्या स्थानावर जसप्रीत बुमराह आहे. विशेष म्हणजे या यादीत 10 च्या 10 क्रिकेटपटूंचा समावेश आहे.

भारतीय क्रीडा क्षेत्रातील टॉप महिला ट्विटर हँडलमध्ये मात्र क्रिकेटपटूंचे वर्चस्व नाही. यामध्ये बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर धावपटू हिमा दास दुसऱ्या, तिसऱ्या स्थानावर सानिया मिर्झा तर चौथ्या स्थानावर सायना नेहवाल आहे. त्यानंतर पाचव्या स्थानावर भारताची अव्वल फलंदाज मिताली राजचा नंबर लागतो. सहाव्या स्थानावर मेरी कॉम, सातव्या स्थानावर स्मृती मानधना, आठव्या स्थानावर द्युची चंद, नवव्या स्थानावर मानसी जोशी आणि दहाव्या स्थानावर राणी रामपाल आहे. 

 "