Wed, Jun 23, 2021 02:41
टीम इंडिया बायो बबलमधून बाहेर पडणार; विराटने उठवला मानसिक आरोग्याचा मुद्दा

Last Updated: Jun 08 2021 5:52PM

लंडन; पुढारी ऑनलाईन : टीम इंडिया इंग्लंडमधील बायो बबल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर सोडणार आहे. विराट सेना २० दिवस बायो बबलमधून बाहेर राहणार आहेत. त्यानंतर ते पुन्हा इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी एकत्र येणार आहेत. 

वाचा : टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याची तारीख ठरली 

भारत संध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर गेली आहे. हा सामना खेळण्यासाठी भारतीय संघ गेल्या महिन्यापासून क्वारंटाईन झाला आहे. इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी संघ १४ दिवस मुंबईत क्वारंटाईन झाला होता. त्यानंतर तो आता इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर तीन दिवस क्वारंटाईन असणार आहे. 

दरम्यान, एका वृत्तवाहिनीला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इंग्लंड दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघाला बायो बबलमधून बाहेर पडण्याची मुभा मिळणार आहे. सुत्रानुसार 'भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्धची फायनल झाल्यानंतर २४ जून नंतर बायो बबलमधून ब्रेक घेणार आहे. त्यानंतर संघ पुन्हा १४ जुलैला इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेची तयारी करण्यासाठी पुन्हा एकत्र येईल.'

इंग्लंड आणि भारत यांच्यातील ५ कसोटी सामन्यांचा मालिका ४ ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. हा दौऱ्या खूपच धावपळीचा जाणार आहे. दोन्ही संघ ६ आठवड्यामध्ये ५ वेळा पाचदिवसीय सामने खेळणार आहेत. यामुळे भारतीय संघावर मानसिक दबाव वाढणार आहे. याबाबत कर्णधार विराट कोहली आणि रवी शास्त्री हे बोलले आहेत. बायो बबलमधील आयुष्य आणि टाईट शड्युल याचा खेळाडूंवर परिणाम होत आहे. त्यामुळे त्यांना काही काळ यापासून दूर जाणे गरजेचे आहे असे मत या दोघांनी व्यक्त केले होते. 

वाचा : सुनिल छेत्रीने मेस्सीला टाकले मागे

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या ब्रेकमध्ये खेळाडू आणि त्याचे कुटुंब हे फक्त युकेमध्येच प्रवास करेल. ते म्हणाले की 'खेळाडूंना काही काळ रिलॅक्स करण्याची गरज आहे. पण, आम्ही कोरोनाची स्थिती पूर्णपणे निवळलेली नाही हे जाणून आहोत. त्यामुळे खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी युके मधला ट्रॅव्हल प्लॅन असा केला जाईल की तेथे खेळाडू आणि त्यांचे कुटुंबीय अडकून पडणार नाहीत. समजा खेळाडू आणि त्यांचे कुटुंबीय दुसऱ्या देशात गेले आहेत. तेथे कोरोनाचे रुग्ण अचानक वाढले आणि त्यामुळे ट्रॅव्हल बॅन आला तर. त्यामध्ये खेळाडू किंवा त्यांचे कुटुंबीय अडकून पडलेत अशी परिस्थिती आम्हाला ओढवून घ्यायची नाही आहे. त्यामुळे आम्ही रिलॅक्स होण्यासाठी युके मधीलच ठिकाणांना प्राधान्य देणार आहोत.'