Wed, Jun 23, 2021 01:18
टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याची तारीख ठरली 

Last Updated: Jun 08 2021 4:47PM

मुंबई; पुढारी ऑनलाईन : टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याची तारीख ठरली. हा दौरा जुलै महिन्यात होणार असून या दौऱ्यावरील सर्व ६ सामने हे एकाच मैदानावर म्हणजे कोलंबोमधील प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहेत.

अधिक वाचा : सुनिल छेत्रीने मेस्सीला टाकले मागे

सोमवारी, सामने प्रसारित करणाऱ्या वाहिनी सोनी टीव्हीने भारत श्रीलंकेच्या दौऱ्यावर ३ एकदिवसीय आणि तीन टी - २० सामने खेळणार असल्याचे जाहीर केले. हे सामने १३ जुलै ते २५ जुलै या दरम्यान होणार आहेत.

निवड समिती २४ खेळाडूंमधून या दौऱ्यासाठी जाणाऱ्या भारतीय संघाची निवड करणार आहेत. या दौऱ्यावर संघाचे नेतृत्व करण्यासाठी शिखर धवन, हार्दिक पांड्या, फिट झाला तर श्रेयस अय्यर यांच्यात चुरस असणार आहे. तीन एकदिवसीय सामने हे १३ जुलै, १६ जुलै, आणि १८ जुलै रोजी खेळवण्यात येणार आहेत. तर तीन टी - २० सामने हे २१ जुलै, २३ जुलै आणि २५ जुलैला होतील. याबाबत बीसीसीआयने अजून अधिकृत माहिती दिलेली नाही.  

या दौऱ्यावेळी भारताचे दोन  संघ दोन वेगवेगळ्या देशात आंतरराष्ट्रीय मालिका खेळत असणार आहेत. हा दुर्मिळ योगायोग आहे. जुलैच्या मध्यावर विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी कंबर करणार आहे. तर मर्यादीत षटकांच्या मालिकेसाठी दुसरा भारतीय संघ श्रीलंकेत खेळत असणार आहे. 

अधिक वाचा : इंग्लंड-न्यूझीलंडमधील पहिली कसोटी अनिर्णीत

भारताचा कसोटी संघ सध्या इंग्लंडमध्ये पोहचला असून तो १८ जून पासून न्यूझीलंडबरोबर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. तर इंग्लंड विरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका ४ ऑगस्ट पासून सुरु होणार आहे.