Thu, Jan 28, 2021 05:20INDvsAUS : भारताला सलग तिसरी वनडे जिंकण्याची संधी

Last Updated: Nov 26 2020 6:01PM
पुढारी ऑनलाईन डेस्क

कोरोना दरम्यान ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर गेलेली टीम इंडिया शुक्रवारी सिडनी येथे वन डे मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. २१ महिन्यांनंतर दोन्ही संघ ऑस्ट्रेलियामध्ये आमने-सामने येतील. ऑस्ट्रेलियन मैदानावरच्या हिरवळीवर उभय संघांमध्ये शेवटचा सामना १५ जानेवारी २०१९ ला खेळला गेला होता. अ‍ॅडलेड येथे खेळल्या गेलेल्या या वनडे सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाला ६ गडी राखून पराभूत केले होते.

यावर्षी म्हणजेच २०२० च्या जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलिया संघानं भारताचा दौरा केला होता. या दौ-यादरम्यान ३ वनडे सामन्यांची मालिका खेळली गेली होती. यातील वानखेडे मैदानावर खेळला गेलेला पहिला सामना ऑस्ट्रेलियानं १० विकेट्सनी जिंकला होता. त्यानंतर सौराष्ट्र मैदानावरच्या सामन्यता टीम इंडियानं पुनरागमन करत ऑस्ट्रेलियावर ३६ धावांनी मात केली. तर चिन्नम्मास्वामी मैदानावरच्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाला ७ विकेट्सनी धूळ चारली होती. त्यामुळे शुक्रवारी होणा-या सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग तिसरा सामना जिंकण्याची संधी आहे.

अखेरच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर टीम इंडियानं मालिका जिंकली...

जानेवारी २०१९ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत २-१ नं विजय मिळवला होता. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना टीम इंडियानं गमावला होता, पण नंतरच्या दोन्ही सामन्यात विजयी कमबॅक करत अ‍ॅरॉन फिंचच्या ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत केलं. 

टीम इंडियानं ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या गेलेल्या मागील पाच सामन्यात धावांचा पाठलाग केला आहे. यातील तीन सामन्यांत विजय मिळवण्यात टीम इंडियाला यश आलं आहे. 

१८ जानेवारी २०१९ (मेलबर्न) : भारत ७ गडी राखून विजयी 
१५ जानेवारी २०१९ (ॲडलेड) : भारत ६ गडी राखून विजयी
१२ जानेवारी २०१९ (सिडनी) : ऑस्ट्रेलिया ३४ धावांनी विजयी
२३ जानेवारी २०१६ (सिडनी) :  भारत ६ गडी राखून विजयी
२० जानेवारी २०१६ (कॅनबेरा) : ऑस्ट्रेलिया २५ धावांनी विजयी

रोहितची उणीव भासणार... 

सलामीवीर फलंदाज रोहित शर्माच्या गैरहजेरीचा टीम इंडियाला फटका बसेल अशी शक्यता माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केली आहे. हॅम-स्ट्रिंगच्या दुखापतीमुळे हिटमॅन रोहित एकदिवसीय आणि टी -20 संघाचा भाग नाहीय. रोहितनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या ४० एकदिवसीय सामन्यात २२०८ धावा केल्या आहेत. यात ८ शतके आणि ८ अर्धशतकांचा समावेश आहे. 

कोहली-धवनवर मदार...

रोहित शर्माच्या गैरहजेरीत शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहलीवर टीम इंडियाच्या फलंदाजीची मदार असेल. कोहलीनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ४० एकदिवसीय सामन्यात ५४.५७ च्या सरासरीनं १९१० धावा केल्या आहेत. 

तर डावखु-या शिखर धवनने २६ एकदिवसीय सामन्यांत ११४५ धावा केल्या आहेत. याशिवाय मशल्या फळीतील श्रेयस अय्यर, मनीष पांडे आणि हार्दिक पांड्या या फलंदाजांकडे धावा जमविण्याची जबाबदारी असेल.

आता रोहितच्या गैरहजेरीत शिखर धवनच्या सोबतीला कोण येणार यावर विचार मंथन सुरू आहे. या शर्यतीत मयंक अग्रवाल आणि शुभमन गिल यांचे नाव आघाडीवर आहे. त्याचबरोबर लोकेश राहुलच्या रुपाने संघाकडे तिसरा पर्यायही उपलब्ध आहे. 

बुमराह-शमीवर गोलंदाजीची जबाबदारी... 

गोलंदाजीची जबाबदारी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्याकडे असेल. दोघांनीही नुकत्याच दुबईत पार पडलेल्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली. याशिवाय फिरकी गोलंदाजांमध्ये युजवेंद्र चहल आणि रवींद्र जडेजा प्रतिस्पर्धी संघांच्या फलंदाजांना चकवू शकतात. 

आता ऑस्ट्रेलियाच्या संघाबद्दल बोलायचं झालं तर, डेव्हीड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ या धडाकेबाज फलंदाजांच्या समावेशामुळे त्यांचा संघ मजबूत झालाय. तर ॲरॉन फिंच आणि मार्कस स्टोइनिस हे फलंदाजही भारतीय गोलंदासाठी एक आव्हान ठरू शकतात. तसेच मार्नस लाबुशाने या तगड्या फलंदाजाला रोखण्यासाठी टीम इंडियाला खास रणनीति बनवावी लागेल. ऑस्ट्रेलियन संघातील मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि जोश हेजलवुडसारखे वेगवान गोलंदाज टीम इंडियाला आव्हान देतील यात तीळ मात्रही शंका नाही. त्याचबरोबर ॲडम झाम्पा हा स्पिनर टीम इंडियाच्या फलंदाजांना धोकादायक ठरू शकेल. 

हवामान आणि पिच रिपोर्ट...

सिडनीमध्ये शुक्रवारी ढगाळ वातावरण राहिल. कमाल तापमान २४ आणि किमाण तापमान १९ डिग्री सेल्यियस राहण्याची शक्यता आहे. सिडनी मैदानाचे पिच फलंदाजांसाठी अनुकुल राहिल असं बोलं जातंय. मात्र. स्पिनर्सही महत्त्वाची भूमिका निभावू शकतात.सिडनीच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करणा-या संघाचा सक्सेस रेट ५६ पुर्णांक ०५ टक्के आहे. 

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान आतापर्यंत १४० एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यात टीम इंडियाने ५२ सामने जिंकले आणि ७८ गमावले, तर १० सामने अनिर्णीत राहिले आहेत. भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्यांच्याच देशात ५१ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यापैकी १३ जिंकलेले आहेत आणि ३६ गमावले आहेत. २ सामन्यांचा निकाल लागलेला नाही. 

सिडनी स्टेडियमचे रेकॉर्ड

एकूण वनडे सामने : १५७
पहिल्यांदा फलंदाजी करताना जिंकलेले सामनने : ८८
रन चेस करताना जिंकलेले सामने : ६२
प्रथम डाव सरासरी धावसंख्या : २२२
दुसरा डाव सरासरी धावसंख्या : १८७