Wed, May 19, 2021 05:55
टी -२० वर्ल्ड कपबाबतही आता अनिश्चितता

Last Updated: May 04 2021 8:46PM

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) 2021 पुढे ढकलल्यानंतर आता यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार्‍या टी -20 वर्ल्ड कप स्पर्धेबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे. देशात वाढत्या कोरोनानंतरही आयपीएलमधील ‘बायो-बबल’ सुरक्षित असायला हवा होता. मात्र, कोरोनाने त्यालाही भेदत खेळाडूंपर्यंत संपर्क साधला. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सुरक्षित जैव-सुरक्षित वातावरणाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

यंदाचा टी-20 वर्ल्ड कप भारतात होणार आहे. या स्पर्धेला अजून 5 महिने बाकी आहेत. त्यामुळे बीसीसीआयला असा विश्वास आहे की, या स्पर्धेच्या सक्तीच्या निलंबनाची शक्यता कमी आहे. आयपीएलदरम्यान आयसीसीची टीम भारत दौर्‍यावर येणार होती. परंतु, कोरोनामुळे त्यांनी दौरा रद्द केला. गेल्या आठवड्यात बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी यूएईला पर्यायी स्थळ म्हणून कायम राखण्यात आले आहे.

देशात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे आणि गेल्या काही दिवसांपासून दर दिवशी कोरोनाची भारतात साडेतीन लाख प्रकरणे समोर येत असून, सुमारे 3000 लोक रोज मृत पावत आहेत. जर परिस्थिती सुधारली नाही तर प्रथमच भारत देशाबाहेर आंतरराष्ट्रीय स्पर्धा किंवा मालिका आयोजित करेल.

बीसीसीआयने यापूर्वी तीनदा परदेशात आयपीएलचे आयोजन केले आहे. यात 2009 मध्ये दक्षिण आफ्रिका, 2014 आणि 2020 मध्ये यूएईला आयपीएल स्पर्धा खेळवण्यात आली होती. यावर्षीही यूएईमध्ये आयपीएल आयोजित करण्याची चर्चा होती; पण बीसीसीआयच्या एका गटाने हा प्रस्ताव नाकारला आणि ही स्पर्धा भारतात आयोजित करण्याचे ठरविले.