Thu, Jan 28, 2021 05:34
आर. अश्विनमध्ये ८०० विकेट घेण्याची क्षमता, मुथय्या मुरलीधरनला विश्वास

Last Updated: Jan 14 2021 4:42PM
सिडनी : पुढारी ऑनलाईन 

भारताचा आघाडीचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन कसोटीत ८०० बळी घेऊ शकतो, असे मत श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन याने व्यक्त केले आहे. मात्र, ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाज नॅथन लायनच्या क्षमतेवर मुरलीधरनने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्याच्याकडे हा टप्पा गाठण्याची क्षमता नसल्याचे त्यांनी म्हटलंय.

अश्विन उत्कृष्ट गोलंदाज, लायन करावी लागेल मेहनत 

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनशी बोलताना मुरलीधरन म्हणाले की, अश्विन शिवाय इतर कोणताही गोलंदाज ८०० बळींपर्यंतचा टप्पा गाठू शकेल असं मला वाटत नाही. ऑस्ट्रेलियाच्या नाथन लायनलाही ते जमेल याबाबत माझ्या मनात शाशंकता आहे. लायन कसोटीत ४०० बळींच्या जवळ पोहोचला आहे, परंतु ८०० बळींचा टप्पा गाठण्यासाठी त्याला कठोर परिश्रम करावे लागणार आहेत आणि बरेच सामने खेळावे लागतील.

लिओन शुक्रवारी करिअरचा १०० वा सामना खेळेल

ब्रिस्बेनमध्ये शुक्रवारी (दि. १५) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याला प्रारंभ होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नाथन लायनचा हा १०० वा कसोटी सामना आहे. ३३ वर्षीय लायनने आतापर्यंत ९९ कसोटी सामन्यात ३९६ बळी घेतले आहेत. त्याचबरोबर ३४ वर्षीय अश्विनने ७४ कसोटी सामन्यांमध्ये २५.५४ च्या सरासरीने ३७७ बळी घेतले आहेत.

कसोटी कारकीर्दीत लिओन ६००-६५० विकेट्स घेण्यास सक्षम 

ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचा विश्वास आहे की कसोटी कारकीर्दीत लिओन ६००-६५० विकेट घेण्यास सक्षम असेल. वॉर्नच्या म्हणण्यानुसार लायन दुखापतीपासून मुक्त राहिल्यास तो पुढील ५ वर्षे क्रिकेट खेळू शकेल आणि हा टप्पा गाठेल.

लायन अजून ५० कसोटी सामने खेळू शकतो 

शेन वॉर्नच्या म्हणण्यानुसार, लयन पुढे आणखी ५० कसोटी सामने खेळू शकतो. जर त्याने प्रत्येक सामन्यात ४ बळी घेतले तर तो २०० ते २५० विकेट घेईल. हे त्यांच्या तंदुरुस्ती आणि कामगिरीवर अवलंबून असेल. लिओन ३८ वर्षे क्रिकेट खेळू शकतो. यानंतरही ते तंदुरुस्त राहिल्यास माझा आणि मुरलीधरनचा विक्रम धोक्यात येऊ शकतो. 

२०१० मध्ये मुरलीधरन कसोटीतून निवृत्ती...

कसोटीत सर्वाधिक ८०० बळींचा विक्रम मुरलीधरनच्या नावावर आहे. त्याने २०१० मध्ये कसोटीतून निवृत्ती घेतली. या यादीत शेन वॉर्न दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्याने ७०८ बळी घेतले. तो २००६ मध्ये ते निवृत्त झाला. भारताचा अनुभवी फिरकीपटू अनिल कुंबळे ६१९ विकेट्सह तिसर्‍या स्थानावर आहे. कुंबळेने २००८ मध्ये निवृत्ती घेतली.