Mon, Nov 30, 2020 12:43होमपेज › Sports › धोनीच्या रांचीत दोन मुंबईकरांनी गाजवला पहिला दिवस!

धोनीच्या रांचीत दोन मुंबईकरांनी गाजवला पहिला दिवस!

Last Updated: Oct 19 2019 5:44PM

भारताचा सलामीवीर रोहित शर्मारांची : पुढारी ऑनलाईन

रांचीच्या जेएससीए क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या मालिकेच्या तिसर्‍या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात रोहित शर्माने शानदार शतक झळकावले. रोहितच्या शतकाच्या जोरावर भारताने चहापानापर्यंत ३ बाद २०० धावांपर्यंत मजल मारली होती. चहापानानंतरच्या खेळास सुरुवात झाली मात्र, काही वेळातच खराब प्रकाशमुळे सामना थांबण्याचा निर्णय पंचांनी घेतला आहे. त्यानंतर पावसास सुरुवात झाली. पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या दिवसाचा खेळ थांबण्यात आला. यावेळी भारताची धावसंख्या ३ बाद २२४ आहे. रोहित शर्मा १४ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ११७ (१६४ चेंडू) तर, अजिंक्य रहाणे ११ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ८३ (१३५ चेंडू) धावांवर खेळत आहेत. दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी १८५ धावांची भागिदारी झाली आहे.

तत्पूर्वी, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा आणि मालिकेतील अंतिम कसोटी सामन्याला आज रांची येथे सुरुवात झाली. भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, भारताला सुरुवातीला एकमागून एक असे तीन धक्के बसले. टीम इंडियाचा सलामीवीर मयांक अगरवाल आणि चेतेश्वर पुजाराला कागिसो रबाडाने माघारी पाठवले. त्यानंतर नॉर्टजेच्या चेंडूवर कर्णधार विराट कोहली आउट झाला. त्यानंतर रोहित शर्माने खेळ सावरत दमदार शतक ठोकले. तर अजिंक्य राहणेने अर्धशतकी खेळी केली. 

रोहितने केली सुनिल गावसकर यांच्या विक्रमाशी बरोबरी... 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीच्या निर्णयानंतर भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. सामन्याच्या पहिल्या सत्रात आफ्रिकेच्या गोलंदाजांनी आक्रमक गोलंदाजी केली. त्यांच्या मा-याने भारताचे तीन महत्त्वाचे फलंदाज माघारी परतले. यामुळे रोहितने आपल्या आक्रमक शैलीत बदल करत संयमी खेळ केला. रोहितचे हे मालिकेतील तिसरे व कसोटी कारकीर्दीतील सहावे शतक ठरले आहे. रोहित शर्माने जेव्हापासून कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीराची जबाबदारी स्वीकारली आहे, तेव्हापासून त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस बसरत आहे. मालिकेच्या पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात शतके ठोकून अनेक विक्रमांना गवसणी घालणा-या हिटमॅन रोहितने रांची येथे दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पुन्हा शतक ठोकून सुनिल गावस्कर यांची बरोबरी केली आहे. 

दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या मालिकेत भारताने २-० अशी आघाडी घेतली असून, तिसरा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेला ३-० असा ‘व्हाईटवॉश’ देण्याचे टीम इंडियाचे टार्गेट आहे. मालिका अगोदरच जिंकल्यामुळे या सामन्यातील निकालाचा मालिकेवर परिणाम होणार नसला तरी कसोटी चॅम्पियनशिपसाठी महत्त्वपूर्ण ४० गुण मिळवण्यासाठी भारतीय संघ खेळणार आहे. तर दुसरीकडे पहिल्या दोन्ही कसोटीत सपाटून मार खाल्लेल्या दक्षिण आफ्रिकेचा संघ शेवटच्या सामन्यात लाज राखण्याचा प्रयत्न करणार आहे.

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला प्रत्येक क्षेत्रात नामोहरम करीत विशाखापट्टणम येथे झालेला पहिला कसोटी सामना २०३ धावांनी जिंकला. त्यानंतर पुण्यातील दुसर्‍या सामन्यात एक डाव १३७ धावांनी दक्षिण आफ्रिकेवर आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय नोंदवला. भारतीय संघाचा विचार करता भारताला फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रांत फारशी चिंता करण्यासारखी कोणतीही गोष्ट दिसत नाही.