Mon, Apr 12, 2021 03:03
IPL FlashBack : सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच कोणाच्या नावावर?

Last Updated: Apr 08 2021 7:47PM

पुढारी ऑनलाईन डेस्क 

आयपीएल इतिहासात आतापर्यंत अनेक रोमहर्षक सामने आपण पाहिले आहेत. अशा अनेक सामन्यात एखाद्या खेळाडूने आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी भरीव योगदान दिले आहे. अशा खेळाडूंना मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. पैशाचा भरपूर खेळ आयपीएलमध्ये होतो. त्यामुळे सामनावीरालाही त्याच्या महत्वपूर्ण कामगिरीसाठी भरगोस बक्षिसी मिळते. 

आयपीएल इतिहासात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी मॅन ऑफ द मॅच जिंकण्याची आकडेवारी ही दुहेरी आकड्यात पोहचली आहे. अशाच आतापर्यंत सर्वाधिकवेळा मॅन ऑफ द मॅच जिंकणारे पहिले पाच खेळाडू कोण आहेत हे पाहणार आहोत. 

आरसीबीचा वाघच यादीत अव्वल 

आयपीएल इतिहासात रॉयल चॅलेंजर बेंगलोरने आतापर्यंत एकदाही आयपीएल जिंकलेली नाही. पण, त्यांचा अव्वल फलंदाज एबी डिव्हिलियर्स त्याच्या संघाला सामना जिंकून देण्यात सर्वांच्या पुढे आहे. जगातील सर्वात चांगल्या मॅच फिनिशरमध्ये गणना होणाऱ्या एबीने आयपीएलमध्ये तब्बल २३ वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला आहे. तो या यादीत सध्या सर्वोच्च स्थानावर आहे. त्याने १५६ सामन्यात ४८४९ धावा केल्या असून त्याचे स्ट्राईक रेट १५१.९१ इतके आहे. 

गेलचे एबीला तगडे आव्हान

सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच जिंकण्याच्या यादीत पहिल्या स्थानावर असलेल्या एबी डिव्हिलियर्सला ख्रिस गेलने तगडे आव्हान दिले आहे. गेल सध्या या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. पण, तो एबी पेक्षा फक्त १ अंकाने मागे आहे. त्याने आतापर्यंतच्या आयपीएल इतिहासात २२ वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला आहे. त्यामुळे गेल एबीला या यादीत कधीही मागे टाकून अव्वल क्रमांक पटकावू शकतो. गेलने आयपीएलमध्ये आतापर्यंत ४ हजार ७७२ धावा केल्या आहेत. यात ६ शतके आणि ३१ अर्धशतकांचा समावेश आहे. 

रोहितकडे विराटचा जर्सी नंबर एवढ्या MOM ट्रॉफी 

आयपीएल इतिहासात सर्वाधिकवेळा मॅन ऑफ द मॅच मिळवणाऱ्यांच्या यादीत रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर आहे. तर भारतीय फलंदाजांचा विचार करता रोहित सध्या अव्वल स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत १८ वेळा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार मिळवला आहे. रोहित एकदा का लागला की तो सामन्याचे पारडे क्षणार्धात बदलतो. या त्याच्या खासियतीमुळे मुंबई इंडियन्सने आतापर्यंत ५ वेळा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले आहे. रोहितने आतापर्यंत ३१.३१ च्या सरासरीने ५ हजार २३० आयपीएल धावा केल्या आहेत.

वॉर्नर - धोनी यांच्यात मोठी चुरस 

आयपीएल इतिहासात सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावणाऱ्यांच्या यादीत चौथ्या स्थानासाठी हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्यात मोठी चुरस निर्माण झाली आहे. दोघांनीही आतापर्यंत १७ वेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकला आहे. वॉर्नरने आतापर्यंत आयपीएल इतिहासात ४२. ७१ च्या उत्तम सरासरीने ५ हजार २५४ धावा केल्या असून त्याचा स्ट्राईक रेट हा १४१.५४ इतका आहे. याचबरोबर आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतके ( ४८ ) ठोकण्याचे रेकॉर्डही त्याच्याच नावावर आहे. 

तर सीएसकेची आन बान आणि शान महेंद्र सिंह धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक २०४ सामने खेळले आहेत. त्यात ४०. ९९ च्या सरासरीने ४ हजार ६३२ धावा केल्या आहेत. त्यानेही आयपीएलमध्ये १७ वेळा मॅन ऑफ द मॅच जिंकण्याची कामगिरी केली आहे. सीएसकेने धोनीच्या नेतृत्वाखाली २०१०, २०११ आणि २०१८ ला आयपीएल विजेतेपद पटकावले आहे.