Thu, Oct 29, 2020 08:02होमपेज › Sports › KXIPvsMI : सामन्याचा राहुल तर, सुपर ओव्हरचा मयांक 'सुपर' हिरो

KXIPvsMI : सामन्याचा राहुल तर, सुपर ओव्हरचा मयांक 'सुपर' हिरो

Last Updated: Oct 19 2020 12:27AM
दुबई : पुढारी ऑनलाईन 

सुपर ओव्हरच्या सुपर संडेत मयांक अग्रवालने  फिल्डिंग करताना षटकार आडवला आणि फलंदाजी करताना दोन चौकार मारत पंजाबला दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकून दिला. तत्पूर्वी मुंबईने डिकॉकच्या अर्धशतकाच्या आणि पोलार्डच्या नाबाद ३४ धावांच्या जोरावर १७६ धावा केल्या. पंजाबकडून कर्णधार राहुलने ७७ धावांची खेळी केली. त्यामुळे पंजाबने सामना टाय झाला. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये मुंबईच्या बुमराहने पंजाबला ५ धावात रोखले. त्यानंतर मोहम्मद शमीनेही मुंबईला ५ धावात रोखत सुपर ओव्हरही टाय केली. यावेळी डिकॉक विजयी धाव घेत असतानाच धावबाद झाला होता. त्यानंतर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मुंबईने जॉर्डनच्या षटकात ११ धावा केल्या. त्यामुळे पंजाबसमोर १२ धावांचे आव्हान आले. मुंबईकडून गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या बोल्टला गेलने षटकार मारत चांगली सुरुवात केली. त्यानंतर मयांकने दोन चौकार मारत सामना संपवला.  

पहिली सुपर ओव्हर टाय झाल्यामुळे बदलेल्या नियमाप्रमाणे दुसरी सुपर ओव्हर खेळवण्यात आली. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये जॉर्डनने ११ धावा देत एक विकेट घेतली. त्यामुळे पंजबासमोर विजयसाठी १२ धावांचे आव्हान मिळाले. मुंबईकडून ट्रेंट बोल्ट सुपर ओव्हर टाकण्यासाठी आला. तर पंजाबकडून मयांक आणि गेल फलंदाजीला आले. गेलने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. आता पंजाबला ५ चेंडूत ६ धावांची गरज होती. पुढच्या चेंडूवर १ धाव केल्याने पंजाबला विजयासाठी ४ चेंडूत ५  धावांची गरज होती. मयांकने चौथ्या चेंडूवर चौकार मारून सामना आवाक्यात आणला. त्यानंतर चौकार मारत सामना स्टाईलमध्ये संपवला.

मुंबईच्या १७७ धावांचा पाठलाग करताना कर्णधार केएल राहुलच्या दमदार ७७ धावांच्या जोरावर २० षटकात ६  बाद १७७ धावा केल्या. सुपर ओव्हरमध्ये गेलल्या या सामन्यात बुमराहने पंजाबला दुसऱ्याच चेंडूवर पूरनला बाद करत धक्का दिला. त्याने या षटकात अखेरच्या चेंडूवर राहुलला बाद करत फक्त ५ धावा दिल्या. विजयासाठीचे ६ धावांचे आव्हान मुंबई पार करताना शमीच्या षटकात पहिल्या तीन चेंडूवर तीन धावा केल्या. त्यानंतर रोहितने चौथा चेंडू डॉट घालवला. त्यामुळे आता मुंबईला २ चेंडूत ३ धावांची गरज होती. रोहितने १ धाव केली. अखेरच्या चेंडूवर २ धावांची गरज असताना डिकॉकने फटका मारत दोन धावा घेण्याचा प्रयत्न केला पण, तो दुसऱ्या धावाला धावबाद झाल्याने सुपर ओव्हरही टाय झाली.  

मुंबई इंडियन्सने ठेवलेल्या १७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना किंग्ज इलेव्हन पंजाबनेही चांगली सुरुवात केली. सलामीवीर मयांक अग्रवाल  आणि केएल राहुल यांनी ३.३ षटकात ३३ धावांची सलामी दिली. पण, बुमराहने अग्रवालचा ११ धावांवर त्रिफळा उडवत ही जोडी फोडली. त्यानंतर आलेल्या ख्रिस गेलने राहुल बरोबर भागिदारी रचण्यास सुरुवात केली. दोघांनी मिळून पंजाबला १० व्या षटकात ७५ धावांपर्यंत पोहचवले. ही जोडी मुंबईची डोकेदुखी ठरणार असे वाटत असतानाच राहुल चाहरने गेलला २४ धावांवर बाद करत पंजाबला दुसरा आणि मोठा धक्का दिला. 

पण, मुंबईचा गेलला बाद केल्याचा आनंद फार काळ टिकला नाही. निकोलस पूरुनने येता क्षणीच आक्रमक फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. त्याच्या या फटकेबाजीमुळे पंजाबने आपले शतक ११ व्या षटकात धावफलकावर लावले. पण, त्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत झुंजार वृत्तीचे दर्शन घडवले. याच दरम्यान, बुमराहने पूरनला बाद करुन पंजाबला तिसरा धक्का दिला. 

दरम्यान, अर्धशतकाजवळ असलेल्या केएल राहुलने षटकार मारुन आपले अर्धशतक पूर्ण केले. पण, दुसऱ्या बाजूने पंजाबची गळती सुरुच राहिली. राहुल चाहरने मॅक्सवेलला शुन्यावर पॅव्हेलियनमध्ये धाडत पंजाबची अवस्था १३. ३ षटकात ४ बाद ११५ धावा अशी केली. यानंतर राहुलने आपला गिअर बदलत वेगाने धावांच पाठलाग करण्यास सुरुवात केली. त्याने संघाला १७ व्या षटकात १५० धावांपर्यंत पोहचवले. पंजाबला १८ चेंडूत २७ धावांची गरज होती त्यावेळी बुमराहने केएल राहुलला यॉर्कर टाकात बोल्ड केले. राहुलने ५१ चेंडूत ७७ धावांची खेळी केली. पंजाबला १२ चेंडूत २१ धावा असताना दिपक हुड्डा आणि जॉर्डनने कुल्टर नाईल टाकत असलेल्या १९ व्या षटकात १३ धावा केल्या.  

अंतिम षटकात पंजाबला विजयासाठी ९ धावांची गरज होती. बोल्ट टाकत असलेल्या या षटकात तिसऱ्या तिसऱ्या चेंडूवर जॉर्डनने चौकार मारत सामना ४ चेंडूत ४ धावा असा आणला. पण, त्यानंतर ट्रेंट बोल्टने टिच्चून मारा करत सामना १ चेंडूत २ धावा असा आणला. जॉर्डनने दोन धावांसाठी फटका मारला पण, दुसऱ्या धावेला तो धावबाद झाला. त्यामुळे आजचा डबल हेडरचा दुसरा सामनाही टाय झाला. 

तत्पूर्वी, आयपीएल २०२० मध्ये आज ( दि. १७ ) डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सची किंग्ज इलेव्हन पंजाबने ७ षटकत ३ बाद ४६ अशी अवस्था केली. मोहम्मद शामी आणि अर्शदीप सिंगने पॉवर प्लेमध्ये भेदक मारा करत रोहित शर्मा ( ९ ), सूर्यकुमार यादव ( ० ) आणि इशान किशन ( ७ ) या मुंबईच्या तगड्या फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.  

पण, त्यानंतर क्विंटन डिकॉक आणि कृणाल पांड्याने मुंबईचा डाव सावरत १० षटकात ७० धावांपर्यंत मजल मारली. या जोडीने चौथ्या विकेटसाठी ५८ धावांची भागिदारी रचली. पण, रवी बिश्नोईने ३० चेंडूत ३४ धावा करणाऱ्या कृणाल पांड्याला बाद करत ही जोडी फोडली. दरम्यान, डिकॉकने ३९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण करुन संघाला १५ षटकात ४ बाद ११४ धावांपर्यंत मजल मारुन दिली.  

पण, डिकॉकला दुसऱ्या बाजूने साथ देणारे फलंदाज एका पाठपाठ एक बाद होत होते. कृणाल पांड्या बाद झाल्यानंतर आलेला त्याचा भाऊ हार्दिक पांड्या ८ धावा करुन माघारी परतला. त्यानंतर डिकॉकही ४३ चेंडूत ५३ धावा करत बाद झाला. त्यामुळे अखेरच्या षटकात मुंबईची धावगती वाढवण्याची जबाबदारी कायरन पोलार्डवर आली होती. त्याच्या जोडीला नॅथन कुल्टर - नाईल आला होता. 

या दोघांनी स्लॉग ऑव्हरमध्ये आक्रमक फलंदाजी करत संघाचे दिडशतक धावफलकावर लावले. कुल्टर - नाईलने  १२ चेंडूत २४ धावांची खेळी केली तर पोलार्डने १२ चेंडूत ३४ धावांची खेळी करत मुंबईला १७६ धावांपर्यंत पोहचवले. या दोघांनी अखेरच्या षटकात २० धावा केल्या.

 "