Thu, Oct 01, 2020 18:08होमपेज › Sports › स्टार्कने ग्लेन मॅग्राचे वर्ल्डकप रेकॉर्ड मोडले 

स्टार्कने ग्लेन मॅग्राचे वर्ल्डकप रेकॉर्ड मोडले 

Published On: Jul 11 2019 10:33PM | Last Updated: Jul 11 2019 10:33PM
बर्मिंगहॅम : पुढारी ऑनलाईन 

वर्ल्डकपमधील एजबस्टन येथे झालेल्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये यजमान इंग्लंडने आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाचा ८ विकेट राखून दारूण पराभव केला. या विजयाबरोबरच त्यांनी २७ वर्षानंतर म्हणजे १९९२ नंतर पहिल्यांदाच वर्ल्डकप फायनल खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाचा २२३ धावात ऑल आऊट झाला आणि नंतर इंग्लंडने ३३ षटकातच तो चेस केला. या सर्व धुरळ्यात स्टार्कचा विक्रम मात्र दुर्लक्षित राहिला. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये जबरदस्त गोलंदाजी करत असलेल्या स्टार्कने उशिरा का होईना पण या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पहिले यश मिळवून दिले होते. 

रॉय आणि बेअरस्टोने वर्ल्डकपमधील आपली चौथी शतकी सलामी दिली. या दोघांनी १२४ धावा चोपल्या असताना स्टार्कने ३४ धावांवर असलेल्या जॉनी बेअरस्टोला बाद करत ही जोडी फोडली. स्टार्कची ही यंदाच्या वर्ल्डकपमधील २७ वी विकेट होती. या विकेटबरोबरच त्याने ऑस्ट्रेलियाच्याच ग्लेन मॅग्राचा एका वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम मोडला. मॅग्राने २००७ च्या वर्ल्डकपमध्ये २६ विकेट काढल्या होत्या. आता हा स्टार्कने हा विक्रम आपल्या नावावर केला. स्टार्कने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये दोनवेळा ५ विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये स्टार्कनंतर बांगलादेशच्या मुस्तफिजूरने २० विकेट काढल्या आहेत. 

दरम्यान, सलामीवीर जेसन रॉयच्या तडाखेबाज ८५ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ठेवलेले २२४ धावांचे आव्हान इंग्लंडने ३२.१ षटकात ८ विकेट राखून लिलया पार करत तब्बल २७ वर्षांनी फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. न्यूझीलंडने भारताचा १८ धावांनी पराभव करून या आधीच फायनल गाठली आहे. आता इंग्लंडही ऑस्ट्रेलियाला ८ विकेट्सनी हरवून फायनलमध्ये पोहचली. हे दोन्ही संघांनी आतापर्यंत एकदाही वर्ल्डकप जिंकलेला नाही. त्यामुळे क्रिकेट जगताला नवा विश्वविजेता मिळणार आहे. दरम्यान, इंग्लंडने वोक्स, राशिद आणि जोफ्रा आर्चरने भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाला २२३ धावात गुंडाळले. ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथ(८५) आणि ॲलेक्स कॅरीने (४६ ) झुंजार फलंदाजी करत २०० चा टप्पा पार करून दिला. पहिली लो स्कोरिंग मॅच रंगतदार झाली होती त्यामुळे  ही लो स्कोरिंग मॅचही रंगतदार ठरणार असे वाटत असतानाच सलामीला आलेल्या रॉयने तुफान फटकेबाजी सुरु केली. यावरून इंग्लंडला फायनलमध्ये जाण्याची फारच गडबड लागली आहे असा भास झाला. रॉय आणि बेअरस्टोने वर्ल्डकपमधील चौथी शतकी (१२४) भागिदारी रचली. त्यानंतर रूट(४९) आणि मॉर्गनने (४५) ३३ व्या षटकात २२४ धावांचा टप्पा पार करत इंग्लंडला फायनलमध्ये पोहचवले.