ब्रिस्बेन : पुढारी ऑनलाईन
आघाडीच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात करूनही नांगी टाकल्यानंतर सातव्या क्रमांकावर आलेल्या वॉशिंग्टन सुंदर आणि आठव्या क्रमांकावर आलेल्या शार्दुल ठाकूर यांनी उत्कष्ठ फलंदाजीचा नजराणा पेश करत भारताची कसोटीत वापसी केली आहे. दोघांनी सातव्या विकेटसाठी विक्रमी १२३ धावांच्या भागीदारीमुळे भारताला ३३६ धावांपर्यंत मजल मारता आली. दोन्ही फलंदाजांनी कसोटी पहिल्यावहिल्या अर्धशतकांची नोंद करत संघाला तारले. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाकडे ५४ धावांची आघाडी आहे.
ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ३३ धावांची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेजलवुडने दमदार मारा करत पाच भारतीय फलंदाजांना माघारी धाडले. भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात करून अपेक्षित खेळी करता आली नाही. शार्दुल ठाकूरने दमदार अर्धशतक केले. त्याचे हे पहिलेच अर्धशतक आहे. त्याला ६७ धावांवर कमिन्सने बाद केले. वॉशिंग्टन सुंदरनेही ६७ धावांची दमदार खेळी करत संघाला सुस्थितीत नेले.
तिसऱ्या दिवशी उपहारापर्यंत भारताने ४ बाद १६१ अशी मजल मारली. त्यानंतर चहापानापर्यंत वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर यांनी दमदार फलंदाजी केली. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार अजिंक्य रहाणेला बाद करत कसोटीवर पकड मिळवली होती. उपहारानंतर खेळ सुरू झाल्यानंतर अगरवालही बाद झाला. त्याला हेजलवूडने बाद करत भारताला पाचवा धक्का दिला. त्यानंतर पंतही बाद झाल्याने अडचण वाढली. मात्र, त्यानंतर शार्दुल आणि वॉशिंग्टन सुंदरने खेळाची सूत्रे आपल्या हाती घेत १२३ धावांची भागीदारी केली.
तत्पूर्वी, चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने आपल्या पहिल्या डावात २ बाद ६२ धावांपर्यंत मजल मारली होती. पावसाच्या व्यत्ययामुळे दिवसाचा खेळ चहापानानंतर थांबवण्यात आला. तत्पूर्वी, दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने ऑस्ट्रेलियाला ३६९ धावात रोखले. भारताकडून नटराजन, शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदने प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. पहिल्या डावात भारताने रोहित शर्माच्या ४४ धावांच्या जोरावर चांगली सुरुवात केली होती. पण, चहापानापूर्वी लायनने त्याला बाद करत भारताला मोठा धक्का दिला.