Fri, Oct 02, 2020 00:06होमपेज › Sports › गतविजेते स्पर्धेबाहेर

गतविजेते स्पर्धेबाहेर

Published On: Jul 12 2019 1:38AM | Last Updated: Jul 11 2019 11:52PM
निमिष पाटगावकर

एजबॅस्टन हे इंग्लंडचे अत्यंत आवडते मैदान का आहे हे आता कळले असेलच. या सामन्याआधी सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून गेले 10 सामने ते एजबॅस्टनच्या मैदानावर जिंकले होते आणि विश्‍वचषकाचा उपांत्य सामन्यात त्यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचा फडशा पाडत एजबॅस्टनचा त्यांचा रेकॉर्ड कायम राखला. 2015 चे विश्‍वविजेते ऑस्ट्रेलिया या विश्‍वचषकाच्या बाहेर गेल्याने आता आपल्याला 1996 नंतर प्रथमच नवा विश्‍वचषक विजेता बघायला मिळणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या किरकोळ आव्हानाचा पाठलाग करताना प्रतिपक्षाच्या मुख्य योद्ध्यावर हल्ला केला की, बाकीचे आपोआप सैरभैर होतात. या धोरणाने जेसन रॉय आणि बेअरस्टो यांनी पहिला हल्ला चढवला तो स्टार्कविरुद्ध. स्टार्कचे पहिले षटक त्यांनी खेळून काढले; पण दुसर्‍या षटकांत 10 आणि तिसर्‍या षटकांत 12 धावा काढल्यावर फिंचला चक्क स्टार्कची गोलंदाजी थांबवावी लागली. इंग्लंडचा पहिला डाव सुपर यशस्वी ठरला. नॅथन लायनला आणले तेव्हा त्याचे स्वागत पहिल्याच चेंडूवर षटकार मारून केले. स्टार्कला फिंचने दुसर्‍या स्पेलला आणले तेव्हा पुन्हा त्याचा समाचार घेतला. फिंचला सलामी कशी फोडू हा प्रश्‍न सतावत असताना स्मिथने जे षटक टाकले ते म्हणजे इंग्लंडला दाखवलेला 21 मोदकांचा नेवैद्य होता.

जेसन रॉयने सामना पंचविसाव्या षटकातच संपवला असता; पण पंच कुमार धर्मसेनाला ऑस्ट्रेलियाची दया आली. इंग्लंडने त्यांच्या डावात 30 चौकार आणि 5 षटकारांची लयलूट करीत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. मॉर्गनने विजयी चौकार मारला तेव्हा मैदानात पाऊस आला तो बहुधा पाच वेळा विश्‍वविजेते असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला आणि प्रेक्षकांना त्यांचे अश्रू लपवायला मदत करण्यासाठी. विश्‍वचषकाच्या इतिहासात ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच उपांत्य सामना हरली. याआधी सकाळी नव्या खेळपट्टीवर भर उन्हात नाणेफेक जिंकून फिंचने अपेक्षित फलंदाजी घेतली. मात्र, ऑस्ट्रेलियाची वाटचाल भारताच्या मार्गाप्रमाणेच झाली. आर्चरने फिंचला दुसर्‍याच षटकात बाद केल्यावर वोक्सने एकामागोमाग एक धक्के देत ऑस्ट्रेलियाची अवस्था 3 बाद 14 केली. स्पर्धेतील टॉपला असलेल्या संघाची उपांत्य फेरीतीलअवस्था 3 बाद 5 होती आणि दुसर्‍या स्थानावर असलेल्या संघाची अवस्था 3 बाद 14 होती. ऑस्ट्रेलियाला सावरले ते स्मिथच्या खंबीर खेळीने. त्याला साथ दिली ती केरी आणि स्टार्कने. त्यांच्या चिवटपणामुळे ऑस्ट्रेलियाने 200 चा टप्पा तरी गाठता आला. वोक्स, आर्चर आणि रशीद यांनी सामन्याच्या योग्य टप्प्यांवर बळी मिळवत ऑस्ट्रेलियाला डोके वर काढू दिले नाही. 

विश्‍वचषक कुणाचा आहे ते कळेलच; पण हा विश्‍वचषक भारतीय प्रेक्षकांचा होता. परवा मँचेस्टरहून निराश होऊन बर्मिंगहॅमला यायला निघालो तेव्हा गाडीच्या डब्यात बरेचसे भारताचे प्रेक्षकच होते. भारताचा पराभव पचवून निव्वळ क्रिकेटला वाहिलेल्या निष्ठेपोटी हा भारतीयांचा मेळावा आता बर्मिंगहॅमला जात होता. दोन महिने आधी निघालेल्या आपल्या ज्ञानोबा-तुकारामांच्या वारकर्‍यांच्या वारीची सांगता आज पंढरपुरात चंद्रभागेतीरी विठुरायाच्या चरणी होत आहे. त्याचप्रमाणे 30 मे रोजी सुरू झालेल्या क्रिकेटप्रेमींच्या वारीची सांगता आता रविवारी थेम्सकाठी क्रिकेट पंढरीत लॉर्डस्ला होणार आहे. उपांत्य फेरीत गेलो तेव्हा आपण लॉर्डस्च्या गाभार्‍यात रविवारची शासकीय इतमामात पूजा नक्की केली होती. मात्र, मँचेस्टरला अचानक व्हीआयपी स्टेटस्मधून आपण सामान्य वारकरी झालो. आता उरले आहे ते फक्त मुखदर्शन. बसमधून एजबॅस्टनला आलो तर पहिले जाणवले ते इथेच भारताच्या इंग्लंड आणि बांगला देशविरुद्ध असलेल्या सामन्यांना असलेला ढोल-ताशे, बिगुल यांचा गोंगाट अजिबात नव्हता. इंग्रज क्रिकेट सामना हा ऑपेरा बघितल्यासारखा बघतात. ऑपेराच्या आधी फॉयरमध्ये उंची वाईन किंवा शँपेनचे घुटके असतात. तर, मैदानात वाहत असते ते बियरचे पाट, इतकाच काय तो फरक.