Thu, Oct 29, 2020 08:14होमपेज › Sports › #MIvsKXIP : मुंबईचा रुबाबदार विजय

#MIvsKXIP : मुंबईचा रुबाबदार विजय

Last Updated: Oct 02 2020 1:49AM
दुबई : वृत्तसंस्था

धडाकेबाज फलंदाजीनंतर जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर 48 धावांनी मोठा विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने कर्णधार रोहित शर्माच्या शानदार 70 धावानंतर केरॉन पोलार्ड (20 चेंडूत 47) आणि हार्दिक पंड्या (11 चेंडूत 30) या दोघांनी केलेल्या तोडफोड फलंदाजीमुळे 20 षटकांत 4 बाद 191 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना पंजाबने 20 षटकांत 8 बाद 143 धावा केल्या. केरॉन पोलार्ड याला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. 

मुंबई इंडियन्सच्या 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना किंग्ज इलेव्हन पंजाबच्या के. एल. राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी धडाक्यात सुरुवात केली; पण पॉवरप्लेचे पाचवे षटक टाकणार्‍या जसप्रीत बुमराहने मयंक (25) याचा त्रिफळा उडवून पंजाबला पहिला धक्‍का दिला. त्याच्या जागी आलेल्या करुण नायरचा कृणालने शुन्यावर त्रिफळा उडवला. त्यामुळे पॉवरप्लेमध्ये पंजाबची अवस्था 2 बाद 41 अशी होती. आठव्या षटकांत संघाचे अर्धशतक फलकावर लागले; पण त्यानंतर फिरकी गोलंदाज राहुल चहरने के. एल. राहुलचा (17) त्रिफळा उडवून मुंबईला मोठे यश मिळवून दिले. 

यानंतर डाव सावरण्याची जबाबदारी निकोलस पूरन आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यावर आली. यात निकोलस पूरनने पुढाकार घेत फटकेबाजी सुरू केली. दोन षटकार ठोकत तो वेगाने अर्धशतकाकडे जात असताना जेम्स पॅटिसनच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक डिकॉककडे झेल दिला. त्याने 27 चेंडूत 44 धावा केल्या. पूरन बाद झाल्यावर मॅक्सवेलने आडवे तिडवे हातपाय मारून झुंज देण्याचा प्रयत्न केला; पण राहुल चहरला षटकार ठोकण्याच्या प्रयत्नात त्याने बोल्टकडे उत्तुंग झेल दिला. मॅक्सवेलने 18 चेेंडूत 11 धावा केल्या. त्यानंतर बुमराहचा बीमर खेळताना जिमी निशामने (7) सूर्यकुमारकडे झेल दिला. यानंतर के. गौतम (22) वगळता पंजाबकडून कोणताही फलंदाज फारसा प्रतिकार करू शकला नाही. त्यांचा डाव 8 बाद 143 धावांवर थांबला. मुंबईकडून बुमराह, चहर आणि पॅटिसन यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. 

तत्पूर्वी, किंग्ज इलेव्हन पंजाबने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला फलंदाजीचे निमंत्रण दिले. पंजाबच्या शेल्डन कॉट्रेलने पहिल्या षटकाच्या पाचव्या चेेंडूवर सलामीवीर क्‍विंटन डी कॉकचा त्रिफळा उडवला. त्याचे हे षटक निर्धाव गेले. त्यामुळे किंग्ज इलेव्हन पंजाबला ड्रीम स्टार्ट मिळाला. त्यानंतर मोहम्मद शमीच्या चेंडूवर रोहित शर्माला पायचित बाद दिले होते; पण तिसर्‍या पंचांनी हा निर्णय चुकीचा ठरवल्याने रोहित बचावला. डिकॉकच्या जागेवर आलेल्या सूर्यकुमार यादवने सलग दोन चौकार ठोकून आपला इरादा स्पष्ट केला. परंतु, रोहित शर्माने टोलवलेल्या चेंडूवर चोरटी धाव घेताना शमीच्या डायरेक्ट थ्रोवर तो धावचित झाला. त्याने 10 धावा केल्या होत्या. 

आरसीबीविरुद्धच्या सामन्यात 99 धावांची खेळी करणारा इशान किशन आज थोडा चाचपडताना दिसला. तो फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करीत होता; परंतु त्याचे टायमिंग जमत नव्हते. त्याने रवी बिश्‍नोईला षटकार ठोकून लय मिळवण्याचा प्रयत्न केला. के. गौतमने त्याची ही धडपड थांबवली. करुण नायरकडे झेल देऊन तो 28 धावांवर तंबूत परतला. 

यानंतर रोहित शर्मा आणि केरॉन पोलार्ड यांनी पंजाबच्या गोलंदाजांचे दडपण झुगारून फटकेबाजी सुरू केली. त्यांनी पंधराव्या षटकांत रवी बिश्‍नोईला 15 आणि 16 व्या षटकात जिमी निशामला 22 धावा चोपून धावफलक वाढवला. परंतु, स्ट्रेटजिक टाईम आऊटनंतर शमीच्या पहिल्याच चेंडूवर रोहित शर्मा झेलबाद झाला. सीमारेषेलगत हा झेल मॅक्सवेलने टिपला, परंतु त्याचा तोल गेल्याने चेंडू निशामकडे फेकला आणि रोहित संयुक्‍त झेलबाद झाला. रोहितने 8 चौकार आणि 3 षटकारांसह 70 धावा केल्या. याच षटकांत केरॉन पोलार्डला पायचित बाद दिले होते. परंतु, डीआरएसमध्ये तो नाबाद ठरला. याचा फायदा घेत पोलार्ड आणि हार्दिक पंड्या यांनी चौफेर टोलेबाजी केली. दोघांनी शेवटच्या 3 षटकांत 62 धावा कुटल्याने मुंबईची धावगती साडेसातवरून साडेनऊच्या पुढे गेली. 3 षटकांत फक्‍त 20 धावा देणार्‍या के. गौतमच्या शेवटच्या षटकांत पंड्या- पोलार्डने 4  षटकांरासह 25 धावा लुटल्या. त्यामुळे मुंबईने 20 षटकांत 4 बाद 191 धावा केल्या.

रोहितच्या पाच हजार धावा

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने आज आयपीएलमध्ये पाच हजार धावांचा टप्पा ओलांडला. मोहम्मद शमीचा पहिलाच चेंडू सीमापार टोलवून त्याने हा विक्रम नोेंदवला.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणार्‍यांच्या यादीत रोहित तिसर्‍या क्रमांकावर असून विराट कोहली (5430) आणि सुरेश रैना (5368) हे दोघे रोहितच्या पुढे आहेत.

 मुंबई इंडियन्स : 20 षटकांत 4 बाद 191. (रोहित शर्मा 70, केरॉन पोलार्ड 47, हार्दिक पंड्या 30. शेल्डन कोर्ट्रेल 1/20.)
 किंग्ज इलेव्हन पंजाब : 20 षटकांत 5 बाद 143. (लोकेश राहुल 17, मयंक अग्रवाल 25, निकोलस पूरन 44, बुमराह 2/18, चहर 2/26)

 "