Fri, Oct 02, 2020 00:23होमपेज › Soneri › पतीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच अभिनेत्री मयुरी देशमुखची भावूक पोस्ट

पतीच्या आत्महत्येनंतर मयुरीची भावूक पोस्ट

Last Updated: Aug 12 2020 2:01PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती आणि अभिनेता आशुतोष भाकरेने २९ जुलै रोजी नांदेडमधील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्याने नैराश्यातून आत्महत्या केली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पतीच्या निधनानंतर पहिल्यांदाच मयुरीने सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

दिवंगत अभिनेता आशुतोष भाकरेचा ११ ऑगस्टला वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मयुरीने आपल्या भावनांची वाट मोकळी केली आहे. तिने केलेल्या पोस्टमध्ये केकचा फोटो शेअर केला आहे. या केकवर आशू असे नाव लिहिण्यात आले आहे. 

काय म्हटले आहे मयुरीने पोस्टमध्ये?

“आशुडा, तुझ्या वाढदिवसाला हा सर्वोत्तम केक तयार करण्यासाठी लॉकडाउनमध्ये मी ३० केक तयार केले. तू त्या सर्व केकचा पहिला घास घेतला होतास, पण हा केक…३० वाढदिवस आधीच साजरे करण्याची ही तुझी पद्धत होती का ? आपल्या प्रियजनांसाठी अनेक प्रश्न तू अनुत्तरित ठेवले आहेस..

आम्हाला माहिती आहे की, तू जे केलंस तो भ्याडपणा नाही तर गेल्या कित्येक काळापासून नैराश्यासोबत सुरु असलेल्या संघर्षातून आलेली असहाय्यता होती. पण गुणी बाळ माझं ते, आपण नैराश्यावर मात करण्याच्या फार जवळ आलो होतो. आपण किती चांगलं काम करत होतो…फक्त अजून थोडे कष्ट घेण्याची गरज होती..

प्रत्येक दिवशी, प्रत्येक सेंकदाला आपल्याला वाटत होतं की अजून थोडा संयम, अजून थोडा धीर आणि नंतर एक निरोगी आणि आनंदी आयुष्य तुझ्यासाठी…आपल्यासाठी वाट पाहत आहे. मला अर्ध्या रस्त्यात सोडून गेलास याबद्दल तुझा राग करावा की जितका वेळ माझ्यासोबत होतास त्यासाठी आभार मानावेत? पण आता त्याने काय फरक पडतो?

तुझ्या आत्म्याचा शांततेत प्रवास व्हावा आणि देवदूत तुला योग्य मार्गदर्शन करतील यासाठी आम्ही सतत प्रार्थना करत असतो. आता देवदूतांचं ऐक, नेहमीप्रमाणे हट्टीपणा करु नकोस…

आशुतोषच्या निधनानंतर मयुरीने पहिल्यांदाच पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिच्या या पोस्टमुळे इतर कलाकार आणि त्यांच्या चाहत्यांच्या डोळ्याच्या कडा पुन्हा एकदा पाणवल्या आहेत. 

 "