Tue, Aug 04, 2020 11:22होमपेज › Soneri › अभिनय माझा ऑक्सिजन

अभिनय माझा ऑक्सिजन

Published On: Jul 12 2019 1:39AM | Last Updated: Jul 11 2019 10:24PM
धोनीच्या बायोपिकमधून चर्चेत आलेली अभिनेत्री दिशा पटानीचे नाव आता भारत चित्रपटामुळे घराघरात पोचले आहे. दिशा पटानी जेव्हा मुंबईत आली तेव्हा ती कोणालाही ओळखत नव्हती. वयाच्या 18 व्या वर्षी तिने मॉडेलिंग केले. मात्र त्यानंतर तिला चांगले मानधन मिळू लागले आणि ती स्वत:ला स्वतंत्र समजू लागली. 

भारत चित्रपटानंतर दिशा पटानीचा करिअर ग्राफ अचानक बदलला आहे. ती लवकरच मोहित सुरीचा चित्रपट ‘मलंग’साठी ती शूटिंग सुरू करणार आहे. जाहिरातीच्या दुनियेत तिची धमाकेदार एंट्री झाली आहे. एवढेच नाही तर, राकेश रोशनचा चित्रपट ‘क्रिश 4’ मध्ये तिला प्रियंका चोप्राला पर्याय म्हणून घेतले आहे. हा उल्लेख महत्त्वाचा आहे. कारण प्रियंका चोप्राप्रमाणेच ती मॉडेल आहे. याशिवाय तिचे कुटुंबीय हे प्रियंका चोप्राप्रमाणेच आहे. पटानीच्या कुटुंबातील बहुतांश जण पोलिस दलात किंवा लष्करी सेवेत आहेत. तिलाही लष्करात जाण्याची इच्छा होती. मात्र त्यानंतर तिचा विचार बदलला. आता चित्रपटात प्रामाणिक पोलिस अधिकार्‍याची भूमिका करू इच्छित आहे. यापूर्वीही तिने अशा प्रकारची भूमिका वठविली आहे. भारत चित्रपट हा तिने केवळ सलमानमुळे केला. आतापर्यंत तिने कोणतीही विशेष छाप पाडलेली नाही, हे ती मान्य करते. कारण तिच्यात असणारा बोल्डनेस. ती म्हणते, आजकाल प्रत्येक अभिनेत्री ही स्वत:ला बोल्ड म्हणून समोर आणत आहे.

मलाही चांगल्या भूमिकेचा शोध आहे. मलंग चित्रपटातून मला अभिनय सिद्ध करण्याची संधी आहे. लहानपणापासून लाजाळू असणारी दिशा ही कॅमेरासमोर आत्मविश्‍वासाने वावरते. बी.टेकचा अभ्यास अर्धवट सोडून ती लखनौहून मुंबईत आली. इथे तिने बराच काळ ऑडिशन दिले. मात्र एका मॉडेलिंग एजन्सीकडून तिला निमंत्रण आले. त्यानंतर धोनीच्या बायोपिकमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर तिच्या नावाची चर्चा होऊ लागली. भारत चित्रपटानंतर आता ती चर्चेतला चेहरा बनली आहे. आपण जेव्हा प्रथमच मुंबईला आलो तेव्हा कोणालाही ओळखत नव्हतो. मॉडेलिंग करताना आपल्याला चांगले मानधन मिळू लागले तेव्हा आपण आता पायावर उभा राहू शकतो, अशी तिची खात्री झाली. 

- विधिषा देशपांडे