Wed, Aug 12, 2020 00:01होमपेज › Solapur › सोलापूर : दरोडेखोरांना पकडण्यात नातेपुते पोलिसांना यश

सोलापूर : दरोडेखोरांना पकडण्यात नातेपुते पोलिसांना यश

Last Updated: Jul 03 2020 3:14PM
तपासात सायबर शाखेची महत्वाची भूमिका

नातेपुते (सोलापूर) : पुढारी वृत्तसेवा  

माळशिरस तालुक्यातील कोथळे घाट मार्गात रात्रीच्या वेळी निर्जळ ठिकाणाहून देवदर्शनाला जाणाऱ्या प्रवाशांना अडवून लूटमार करणाऱ्या दरोडेखोरांना नातेपुते पोलिसांनी जेरबंद केले. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोथळे शिखर शिंगणापूर घाट मार्गात दि. ११ मार्च रोजी रात्री १०.३० वा. एक घटना घडली. उस्मानाबाद जिल्ह्यातील येवती येथील भाविक जेजुरी खंडोबा देवदर्शन करून शिखर शिंगणापूर येथे महादेवाचे दर्शनासाठी जात होते. त्यावेळी सात अज्ञात दरोडेखोरानी दुचाकीवरून पाठलाग करून चारचाकी क्रूझर जीप गाडी जबरदस्तीने अडवली. वाहनांच्या काचा फोडून चालकाला मारहाण करत त्यांनी दहशत निर्माण केली. 

गाडीतील प्रवासी यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व रोख रक्कम एक लाख पाच हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल लंपास करून अंधाराचा फायदा घेत फरार झाले. नातेपुते पोलिस स्टेशन येथे वाहन चालक चैतन्य सखाराम बंडोरे (वय ३०, रा. यवती उस्मानाबाद) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दरोडेखोरांवर भा. दं. वि. ३९५,३४१, ४२७,५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल झाला होता.

सोलापूर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील व नातेपुते पोलिस स्टेशनचे प्रभारी सपोनि युवराज खाडे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. गुन्हा करणारे संशयित सराईत आरोपी टोळी फलटण तालुक्यातील गोखळी येथे विटभट्टीवर काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पथकाने साफळा रचून टोळीतील तीन आरोपी ताब्यात घेतले. राहुल आप्पा माळी (वय १९ रा. मुसळवाडी) अहमदनगर, राहुल उर्फ टग्या एकनाथ बर्डे(वय २२, रा. पढेगाव), संदीप सुरेश पिंगळे (वय २२,मनेगाव) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपीची कसून चौकशी केल्यावर त्यांनी गुन्हा कबूल केला आहे. त्यांना अटक करून न्यायाल्यात हजर केले असता सहा दिवस पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

या गुन्ह्याचा तपास सपोनि युवराज खाडे, पोलिस हेड अनिल गडदे, शरद कदम, गुन्हे शाखेचे राहुल रणवरे,पो.ना.महेश पाटील, पोहेकॉ राकेश लोहार, सायबर शाखेचे पोलिस रवि हातकिले यांनी यशस्वी कामगिरी केली आहे. गुन्ह्यातील चार साथीदार सहआरोपी अद्याप फरार असून त्यांच्या मागावर पोलिस असून लवकरच त्यांच्या मुसक्या आवळल्या जातील, असे नातेपुते सपोनि युवराज खाडे यांनी सांगितले.