Mon, Apr 12, 2021 03:43
सोलापूर :शिखर शिंगणापूर घाटात वाटमारी करणारी टोळी जेरबंद

Last Updated: Apr 08 2021 4:31PM

नातेपुते : पुढारी वृत्तसेवा

शिखर शिंगणापूर घाटात वाटमारीसह दरोडा टाकणाऱ्या टोळीच्या मुसक्‍या नातेपुते पोलिसांनी ४८ तासात आवळल्‍या. सोमनाथ उर्फ सागर अनिल बनसोडे, अक्षय बबन बल्लाळ (रा.बाजार तळ सदाशिवनगर ता माळशिरस), अभिमान अर्जुन खिलारे (रा. मोरोची ता.माळशिरस), धनाजी साधू दडस (रा. मारकडवाडी ता.माळशिरस), गणेश बाळासो जाधव (रा.जाधववाडी ता.माळशिरस), चैतन्य हणुंमत झेंडे (रा.मोरोची ता.माळशिरस) अशी अटक केलेल्‍या संशयित आराोपींची नावे आहेत. 

अधिक वाचा : कळमण येथे दहावीच्या ७ विद्यार्थिनींना कोरोना

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, (दि.३१ मार्च रोजी) नातेपुते येथील व्यापारी अंबादास उत्तम पंलगे हे महिंद्रा पिकअपमधून शेळ्यामेंढ्या भरुन केरळ येथील व्यापाऱ्यास देण्यासाठी शिंगणापूर घाटातून निघाले होते. या वेळी तीन मोटार सायकलवरील सहा जणांनी त्‍यांचा पाठलाग केला. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घाटातील तिसऱ्या वळणाच्या टप्यावर पिकअप गाडीसमोर मोटारसायकल आडवी लावली.  पिकअपची चावी घेत चालक बापुराव महादेव डोंबाळे व हणमंत शेषेराव बनसोडे यांना पैशाची मागणी करत मारहाण केली. डोंबाळे यांच्याकडील पाच हजार रुपये आणि दोघांचे मोबाईल हिसकावून घेतले. दमदाटी करून पलायन केले. 

चालक बापूराव डोंबाळे यांनी नातेपुते पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली.  शिखर शिंगणापूर घाट व कोथळे घाट याठिकाणी रात्रीच्यावेळी वाहतुकीचा तुरळक असल्यामुळे या ठिकाणी यापूर्वी देखील अशा प्रकराचे घटना घडलेल्या आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु, स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर, पो.नि सर्जेराव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस पथके तयार करुन रवाना केले.

अधिक वाचा : उंदरगावात घरफोडी; ४.७५ लाखांचा ऐवज लंपास

संशयित आरोपी सोमनाथ उर्फ सागर अनिल बनसोडे, अक्षय बबन बल्लाळ हे विना नंबरच्‍या मोटारसायकलवरुन फिरताना दिसले. त्यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे आधिक चौकशी केली असता त्यांनी अभिमान खिलारे, धनाजी दडस, गणेश जाधव, चैतन्यझेंडे यांच्या सहाय्याने गुन्हा केल्याचे सांगितले. संशयितांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, अभिमान अर्जुन खिलारे यांच्‍यावर आटपाटी (जि. सांगली) दहिवडी (जि. सातारा) अहमदनगर, माळशिरस याठिकाणी गुन्हे दाखल आहेत. खिलारे याच्याकडे अधिक तपास केल्यानंतर नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतून दोन मोटारसायकली चोरल्याचे समोर आले आहे. त्या जप्त करण्यात आल्या आहेत. याच गुन्ह्यात २०१५ पासून फरार असणाऱ्या धनाजी साधु दडस यालाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या तीन मोटरसायकल, पाच हजार व दोन मोबाईल असा १ लाख ४० हजार मुददेमाल जप्त केला आहे. 

या पोलिसांनी केली कामगिरी

ही कामगिरी नातेपुते पोलीस ठाणेचे सहा.पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर, पोहे गडदे, पोना मसाजी थोरात, पो.कॉ अजित कडाळे, पो.कॉ अमित जाधव, पो.कॉ विशाल घाडगे, पो.ना राजेश लांडगे, पो.ना सचिन भोसले, पो.ना नवनाथ माने, चालक पोलीस शिपाई राहुल भोसले, पोना सूर्यवंशी, पो.कॉ धनाजी मुटकुळे, पो.कॉ जानकर, पो.कॉ कापसे, पो.ना महेश पाटील, पो.ना. बबलू गाडे यांनी पार पाडली.