Sat, Aug 15, 2020 13:23होमपेज › Solapur › ढोबळेंचा भाजप प्रवेश : कार्यकर्त्यांची अस्वस्थता

ढोबळेंचा भाजप प्रवेश : कार्यकर्त्यांची अस्वस्थता

Published On: Feb 02 2019 1:28AM | Last Updated: Feb 01 2019 11:40PM
मंगळवेढा : प्रा सचिन इंगळे

राज्याचे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. ढोबळे आणि गेल्या साडेचार वर्षांपासून सुरू असलेला वनवास संपुष्टात आला.ढोबळे यांची राजकीय कारकीर्द मंगळवेढा भूमीत बहरल्याने 20 वर्ष काम करत असताना निर्माण केलेले कार्यकर्ते सध्या विविध गटात विखुरले आहेत. ज्यांनी राजकीय कारकीर्द घडवली, त्यांना मदत करावी की पडत्या काळात आपल्या पाठीमागे ताकद दिली. त्यांच्याशी एकनिष्ठ राहावे, या विवंचनेत कार्यकर्त्यांची मात्र चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली आहे.

आपल्या राजकारणाची सुरुवात शरद पवार यांच्या बोटाला धरून करत राज्यभर एक उच्चशिक्षित मागासवर्गीय चेहरा म्हणून चांगली प्रतिमा तयार करण्यात यशस्वी ठरलेले लक्ष्मण ढोबळे यांनी 25 वर्षांत शिक्षणाची गरज ओळखून राज्यभर शाहू शिक्षण संस्थेचे जाळे पसरवले. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी आश्रम शाळांच्या माध्यमातून वंचित व गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सोय केली. अन्नपुरवठा, उच्च शिक्षण, पाणी पुरवठा, खादी ग्रामोद्योग महामंडळ अशा विविध खात्यात मंत्री म्हणून काम करताना आपला राजकीय पसारा वाढवला, यामध्ये त्यांनी बहुजन रयत परिषद नावाने स्वतंत्र अराजकीय व्यवस्था सुरू केली. राज्यभर मातंग समाजाच्या अडीअडचणी तक्रारी सोडवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. पक्षात राहून पक्षासोबत दाखवलेला प्रामाणिकपणा त्यांना त्यांच्या स्वकीय विरोधकांकडून  पक्षातील ज्येष्ठांना झालेल्या मार्गदर्शनातून त्यांना मोहोळ विधानसभा मतदार संघातून बाजूला ठेवण्यात आले आणि तिथूनच ढोबळे व राष्ट्रवादी हा संघर्ष सुरू झाला. ढोबळे एक टर्म मोहोळचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना मंगळवेढ्याकडे त्यांचे झालेले दुर्लक्ष हे कार्यकर्त्यांना नवी राजकीय ताकद शोधण्यास पुरेसे ठरले. यामुळे मंगळवेढ्यात असणारी त्यांचे शेकडो महत्त्वाचे कार्यकर्ते सध्या आ. भारत भालके, आ. प्रशांत परिचारक, समाधान आवताडे यांच्यासमवेत काम करीत आहेत.  सध्या आ. भारत भालके हे विधानसभेसाठी काँग्रेसकडून निश्‍चित झालेले उमेदवार आहेत. मात्र त्यांच्यासमोर परिचारक किंवा आवताडे हे विधानसभा निवडणूक लढवणार आहेत का? याबाबत खुद्द कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रमावस्था आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षाचे प्रमुख पदाधिकारी हे एकेकाळचे ढोबळे निष्ठावंत होते मात्र बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार ढोबळे यांनी दहा वर्षापूर्वी यातील अनेक कार्यकर्त्यांना आ. भारत भालके व आ. प्रशांत परिचारक यांच्या राजकीय नेतृत्वाखाली काम करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यामुळे अशा परिस्थितीत आता हातात कमळ घेतलेले लक्ष्मण ढोबळे सोलापूर लोकसभा व पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये नक्की कोणत्या ताकतीवर पक्षाच्या उमेदवाराचा किंवा पक्षाने उमेदवारी दिली तर लोकसभेला स्वतःला मताधिक्य घेण्याबाबत कसे फासे टाकणार आहे पहावे लागणार आहे. कारण  काँग्रेसकडून लोकसभेला माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नाव जवळपास निश्‍चित झाले आहे. त्यादृष्टीने गेल्या सहा महिन्यांपासून सुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवेढा, पंढरपूर भागात गाठीभेटी सुरू करून आपली यंत्रणा कामाला लावली आहे. काँग्रेसच्या विविध सेलच्या अनेक पदाधिकार्‍यांच्या निवडी केल्या आहेत. केल्या  गेलेल्या निवडीमध्ये  देखील अनेक पदाधिकारी पूर्वाश्रमीचे ढोबळे समर्थक म्हणून ओळखले जातात. अशा परिस्थितीत काही महिन्यांनी होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पंढरपूर- मंगळवेढा भागातील सध्या भालके ,परिचारक व आवताडे यांच्या सोबत असणारे एकेकाळचे ढोबळे यांचे निष्ठावंत सहकारी आगामी निवडणुकांत काय करायचे? या विचाराने अस्वस्थ झाले आहेत. मंगळवेढा तालुक्यातील संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ढोबळे यांनी आवताडे यांना मदत केली. तर पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत ढोबळे यांनी भालके व परिचारक यांच्यासमवेत आवताडे यांना विरोध केला. प्रत्येक निवडणुकीत ढोबळे यांचा अंदाज वेगळा असतो. 
मात्र पार्टी विथ डिफरन्स असा शिस्तीचा शिरस्ता असलेला भारतीय जनता पक्ष आता ढोबळेेे यांनी निवडल्याने कार्यकर्त्यांची मात्र अस्वस्थता वाढत चालली आहे.