Sun, Jan 17, 2021 12:33
मोहोळ येथे प्रेमी युगलाची गळफास घेत आत्महत्या

Last Updated: Jan 06 2021 9:28PM
मोहोळ : पुढारी वृत्तसेवा

प्रेम संबंधातून १९ वर्षीय तरुण आणि त्याच्या अल्पवयीन प्रेयसीने एकाच स्कार्फने चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि. ६) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास बी.पी.एड. कॉलेज मोहोळ परिसरात उघडकीस आली. भूषण धनंजय पडवळकर (वय १९, रा. देशमुख गल्ली, मोहोळ) आणि वैष्णवी नामदेव थोरे (वय, १७, रा. स्टेशन रोड, मोहोळ) अशी आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगलांची नावे आहेत. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसांत करण्यात आली आहे.

अधिक वाचा : सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना अटक

या बाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, नागनाथ गल्ली मोहोळ येथील भूषण धनंजय पडवळकर आणि स्टेशन रोड येथील वैष्णवी नामदेव थोरे यांचे एकमेकांवर प्रेम होते. दोघांनीही प्रेमाच्या आणाभाका घेऊन लग्न करून सुखी संसाराची स्वप्ने पाहिली होती. मात्र दोघेही भिन्न जातीचे असल्याने दोघांच्याही घरचे आपल्या या नात्याला स्विकारणार नाहीत, असा त्यांचा समज झाला होता. यामुळेच गेल्या काही दिवसांपासून दोघेही मानसिक तणावात वावरत होते.

अधिक वाचा : अनैतिक संबधात अडसर ठरलेल्या मुलाला आईनं प्रियकराच्या मदतीनं संपवलं; अन्...

बुधवारी (दि. ६ रोजी) सकाळी सव्वा दहा वाजता कटींग करून येतो असे सांगून भूषण घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर त्याने आपली प्रेमिका वैष्णवीची भेट घेऊन सोलापूर - पुणे महामार्गाच्या लगत असणारे बी.पी.एड. कॉलेज गाठले. या ठिकाणी त्यांनी एकत्र जगता येत नसल्याने किमान एकत्र तर मरू असे म्हणत चिंचेच्या झाडाला एकाच स्कार्फने गळफास घेऊन आपल्या प्रेमकहानीला पुर्णविराम दिला. दुपारी ३ वाजता ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली. 

अधिक वाचा : सोलापूरचे उपमहापौर राजेश काळेंना अटक 

या प्रकरणी संजय विलास पडवळकर यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक माने हे करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे मोहोळ शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.