Tue, Aug 04, 2020 10:45होमपेज › Solapur › सोलापूर पुन्हा होणार लॉकडाऊन  

सोलापूर पुन्हा होणार लॉकडाऊन  

Last Updated: Jul 12 2020 1:32AM
सोलापूर : पुढारी वृत्तसेवा 

सोलापूर शहर व जिल्ह्यात सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत बाधितांच्या संसर्गाची साखळी तोडणे अपेक्षित असल्याने त्यासाठी सोलापूर शहरात लॉकडाऊन घ्यावा, अशी मागणी लोकप्रतिनिधींमधून होत होती. यासाठी पालकमंत्र्यांनी लोकप्रतिनिधी आणि अधिकार्‍यांची बैठक घेऊन शुक्रवारी सोलापुरात लॉकडाऊन करण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

सोलापूर शहरात येत्या काही दिवसांत लॉकडाऊन होणार आहे. हे करताना सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी किमान त्यांना तीन दिवस अगोदर कल्पना द्या आणि मग निर्णय घ्या, अशा सूचना पालकमंत्री भरणे यांनी दिल्या आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस अधीक्षक मनोज पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी एकत्रित बसून शहरासाठी अ‍ॅक्शन प्लॅन तयार करावा. लॉकडाऊनच्या काळात कोणाची गैरसाय होणार नाही याची काळजी घ्यावी. हा लॉकडाऊन कडक आणि परिणामकारक व्हावा यासाठी पोलिस आणि आरोग्य यंत्रणा सक्षम आणि सतर्क करा, अशा सूचना पालकमंत्री भरणे यांनी दिल्या आहेत.त्यामुळे येत्या काही दिवसांत सोलापूर शहरात लॉकडाऊन होणार असल्याचे आता स्पष्ट झाले असून कधीपासून कधीपर्यंत लॉकडाऊन घ्यायचा, याचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी यांंना आणि संबंधित विभागांच्या प्रमुखांना देण्यात आले आहेत.    

जिल्हाधिकारी येत्या दोन दिवसांत याबाबतीत अधिकृत घोषणा करणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे तसेच सुरक्षेची काळजी घ्यावी, सॅनिटायझर, मास्कचा वापर करावा, विनाकारण रस्त्यावर फिरु नये, स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री भरणे यांनी केले आहे.

यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, आ. प्रणिती शिंदे, उपमहापौर राजेश काळे, संतोष पवार, आनंद चंदनशिवे, किसन जाधव यांच्यासह पोलिस अधीक्षक मनोज पाटील, पोलिस आयुक्त अंकुश शिदे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ आदी उपस्थित होते.