Fri, Feb 26, 2021 06:40
सोलापूरचे जिल्हाधिकारी, जि.प. सीईओ पॉझिटिव्ह

Last Updated: Feb 24 2021 2:32AM

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा    

सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दुसर्‍यांदा कोरोनाची लागण झाली आहे. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. शंभरकर यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. स्वामी होम क्‍वारंटाईन झाले आहेत. दोघांची  प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात आले. 

जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवार, 19  रोजी शंभरकर यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या सभागृहात आढावा बैठक बोलविली होती. बैठकीपूर्वीच त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांनी स्वामी यांना पुढे बैठक घेण्याचे सांगितले.  लक्षणे दिसत असल्याने शंभरकर यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ते पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांच्यावर सध्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी शीतलकुमार जाधव यांनी सांगितले. स्वामी यांना मधुमेह असल्याने त्यांनी मंगळवारी कोरानाची स्वत:हून चाचणी केली. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ते होमक्‍वारंटाईन झाले आहेत. 

जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेचे दोन्ही आयएएस असलेले मुख्य प्रमुखच कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे त्यांच्या संपर्कात असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांनीही कोरानाची चाचणी करुन घेण्यास सुरुवात केली आहे.