Wed, May 19, 2021 04:12
एकाच अ‍ॅम्ब्युलन्समधून सहा मृतदेह नेले कोंबून 

Last Updated: May 05 2021 2:24AM

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

शहरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. रुग्णांचे हाल सुरू असून, मृत्यूचे तांडवच सुरू आहे. अशा परिस्थितीत उपचाराची यंत्रणा तोकडी पडत आहेच; पण मृतदेह वाहण्यासाठीही अ‍ॅम्ब्युलन्स व अंत्यसंस्कारासाठीही मृतदेह तिष्ठत राहात आहेत. आज तर चक्क सहा मृतदेह एकाच अ‍ॅम्ब्युलन्समधून कोंबून नेण्याची प्रशासनावर नामुष्की आली. दुसरीकडे तीन मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवून तीन मृतदेहांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली.

दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग अधिकच वाढू लागला आहे. एका महिन्यात तब्बल 40 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले, तर सुमारे 823 जणांचे बळी गेले आहेत. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर इंजेक्शनचाही तुटवडा निर्माण झाला असून, रुग्णांचे हाल सुरू आहेत.  अशा परिस्थितीत जिल्हा, 

महापालिका आणि खासगी यंत्रणांमार्फत कोरोना उपचारासाठी प्रयत्न सुरुच आहेत. कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा पुरविण्यात मनपा प्रशासनाला आता अपयश येऊ लागले आहे. 
सोलापूर महापालिकेकडे एकूण 7 रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. नुकत्याच खासगी दवाखान्यातील 4 रुग्णवाहिका महापालिकेने ताब्यात घेतल्या आहेत. संपूर्ण शहरातील आरोग्य वाहतूक व्यवस्था ही केवळ 11 रुग्णवाहिकांवर अवलंबून आहे. त्यातील दोन रुग्णवाहिका केवळ कोरोनाने मृत पावलेल्या मृतदेहांना स्मशानभूमीपर्यंत पोहोचविण्याकरिता राखीव ठेवण्यात आल्या आहे. त्यामुळे नऊ रुग्णवाहिकांतून मनपाचे 9 कोविड सेंटरसह 55 खासगी रुग्णालयांतील रुग्णांना  कोविड सेंटरपर्यंत पोहोचविणे अथवा खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यासाठी यंत्रणेची धावाधाव सुरू असते. कोरोना रुग्णांशी निगडीत असलेली सर्व वाहतूकसुविधा ही महापालिकेच्या रुग्णवाहिकेतून केली जाते. 

शहरात कोरोनाने मृत पावलेल्या मृतदेहांना ने-आण करण्यासाठी संपूर्ण शहरासाठी केवळ दोन रुग्णवाहिका आहेत. त्यामुळे रुग्णवाहिकेवरील ताण वाढल्याने एकाच वेळी पाच, सहा मृतदेहांना कोंबून स्मशानभूमीत अंत्यसंस्काराला नेण्याची वेळ या कर्मचार्‍यांवर आली आहे. त्यामुळे एकप्रकारे मृतदेहांची विटंबनाच होत असल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. दुसरीकडे अंत्यसंस्कारातही विटंबना होत असल्याच्या तकारी होऊ लागल्या आहेत. मात्र या परिस्थितीबाबत प्रशासनाला माहिती असूनदेखील याकडे जाणूनबुजून कानाडोळा करत असल्याच्या तक्रारी सदस्यांकडून होत आहे.  

अशापरिस्थितीत मंगळवारीही मृत जनावरांप्रमाणे सहा मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून कोंबून नेल्याचे चव्हाट्यावर आले. शहरातील रुपाभवानी स्मशानभूमीत हे मृतदेह नेण्यात आले. त्यातील तीन मृतदेह गाडीत ठेऊन तीन मृतदेहांवर एकाचवेळी ओळीने रचून अंत्यसंस्कार करण्यात आले. याबद्दल शहरात जोरदार चर्चा होती. यासंदर्भात नगरसेवकांनी आयुक्त आणि प्रशासनाला धारेवर धरले.