Mon, Apr 12, 2021 03:53
सावधान! मस्ती केली तर सोडणार नाही, पोलिसांनी लावले सूचना फलक, नागरिकांत जोरात चर्चा

Last Updated: Feb 26 2021 10:44PM

सांगोला : पुढारी वृत्तसेवा

सांगोला पोलिस स्टेशनमध्ये नव्याने पोलिस निरीक्षक पदावर रुजू झालेले भगवान निंबाळकर यांनी शहर व तालुक्यातील गुंडगिरी व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची गय केली जाणार नाही, असे सांगून नवीन पद्धतीने शांतता व सुव्यवस्था निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. शहरात विविध चौकात सांगोला पोलिसांनी सूचना फलक लावला आहे. या फलकाची नागरिकांमधून जोरात चर्चा सुरू आहे. शांतताप्रिय लोकांमधून अपेक्षा वाढल्या आहेत. खरेतर जनता विना वर्दीतील पोलिस असते. म्हणून सर्वसामान्य जनता आणि पोलिस यांच्यात समन्वय महत्त्वाचा आहे.

सांगोला तालुक्यातील जनता व राजकीय पक्षांचा विचार करता नेहमीच उपद्रव कमी आणि राजकीय शांतता दिसून येते. वारंवार मोर्चे, आंदोलने, उपोषण आदी सांगोला तालुक्यात इतर तालुक्याच्या मानाने जास्त नाहीत. परंतु याचे दुष्काळी तालुक्यात सांगोला तालुक्यात बेकायदेशीर धंदे व वाळू व्यवसाय नेहमी जोरात चर्चेत असतात. दुष्काळाकडून विकासाकडे घोडदौड करणार्‍या सांगोला तालुक्यात अवैध धंदे छुप्या पद्धतीने सुरू असल्याचे अनेक वेळा कारवाई वरून दिसून आले आहे. दुष्काळ म्हणून वर्षानुवर्षे टाहो फोडणार्‍या तालुक्यात बेकायदेशीर धंदे समाजहिताचे नाहीत. याबाबत अनेकवेळा फक्त आत्मचिंतन केले जाते.पण प्रत्यक्षात मात्र ठोस काही केले जात नाही. परत असे धंदे सुरू होतात.

पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी काही दिवसांपूर्वी सांगोला पोलिस स्टेशनचा पदभार घेतला आणि त्याचदिवशी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, गुंड व गुन्हेगारांची गय केली जाणार नाही. यापुढे जाऊन आता पोलिसांनी सांगोला शहरातील विविध चौकात चक्क गुंडांना अनेक गुन्हेगारांना सावधान होण्याचा इशारा दिला आहे. तसेच सावकारकी, दमदाटी, फसवणूक, लुबाडणूक, लूट, सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करणे, वाढदिवस साजरा करणे, गोंधळ घालणारे व वाहतुकीसंदर्भात नियम याबाबतचा सूचना फलक लावला आहे. पोलिस आणि सर्वसामान्य जनता यांच्यामध्ये योग्य समन्वय निर्माण झाल्यास तालुक्यातून गुंडगिरी हद्दपार होण्यास वेळ लागणार नाही. 

कायदा व सुव्यवस्थेसाठी सांगोला पॅटर्न...

सर्वसामान्य जनतेच्या 24 तास पोलिस पाठीशी आहेत, असे सांगत पो.नि. निंबाळकर यांनी सर्वसामान्य जनतेलाच हाक दिली आहे. याचे स्वागत होत आहे. पोलिस आणि सर्वसामान्य जनता यांच्यामध्ये एकोपा व विश्वास निर्माण झाल्यास तालुक्यांमध्ये शांतता व कायदा सुव्यवस्था निर्माण होईल. त्यानिमित्ताने एक अनोखा सांगोला पॅटर्न निर्माण होईल, त्यादृष्टीने सांगोला पोलिसांनी घेतलेल्या उपक्रमाला जनतेची साथ गरजेची आहे.