Fri, Feb 26, 2021 05:50
शेतकर्‍याची १९ लाखांची फसवणूक

Last Updated: Feb 24 2021 2:32AM

बार्शी : पुढारी वृत्तसेवा

बार्शी येथे वेअर हाऊसमध्ये शेतकर्‍याने ठेवलेली तब्बल 18 लाख 75 हजार रुपयांची तुरीची वेअर हाऊस मालकासह दोघांनी परस्पर विक्री केली. याप्रकरणी शेतकरी नरहरी साहेबराव अंधारे (वय 78,  रा. माणकेश्‍वर, ता. भूम, जि. उस्मानाबाद) यांनी बार्शी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी वेअरहाऊस वामा वेअर हाऊसिंग, भोयरेचे मालक संतोष बागमार (रा. बार्शी) व व्यापारी किरण बाळासाहेब शिराळ (रा. घोडके प्लॉट, बार्शी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अंधारे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 2019-2020 मध्ये दोघा मुलांच्या चाळीस एकर व माझ्या पाच एकर जमिनीत पांढर्‍या तुरीचे उत्पादन घेतले. पिकाची काढणी जानेवारी 2020 च्या शेवटी, तर मळणी फेब्रुवारीच्या पहिल्या व तिसर्‍या आठवड्यात केली. एकूण तुरीचे उत्पन्न 25 टन 795 किलो झाले. त्यातून 10 टन 385 किलो तूर 10 फेब्रुवारी 2020 रोजी, तर 12 टन 305 किलो व 3 टन 105 किलो, अशी पांढरी तूर  19 फेब्रुवारी रोजी बार्शी यार्डातील ओळखीचे व्यापारी किरण बाळासाहेब शिराळ यांच्या (दुकान नंबर 77)   अडतीवर विकण्यासाठी आणली. त्यावेळी तुरीचा भाव 4500 ते 4700 प्रति क्विंटल होता. भविष्यात तुरीचा दर रुपये 7500 प्रति क्विंटल भाव जाण्याची शक्यता होती. त्यामुळे त्याचवेळी तूर विकण्यासंदर्भात सांगितले.

त्यावेळी शिराळ यांनी त्यासाठी आणखी पाच ते सात महिने वेळ लागेल, असे सांगितले. त्यासाठी त्यांनी त्यांच्या ओळखीचे संतोष बागमार वामा वेअर हाऊस, भोयरे, ता. बार्शी येथे ठेऊ, असे सांगितले. त्यांच्या ओळखीच्या व त्यांच्या मध्यस्थीमार्फत अंधारे यांनी तुरी  वेअर हाऊसमध्ये ठेवली. त्या  मालाची नोंद वेअर हाऊसला ठेवल्याबाबत त्यांच्याकडे वरील तारखेला नोंदी आहेत. 

तूर ठेवल्याची पावती मागितली. परंतु दोघांनीही पावतीपुस्तक संपल्याचे मला सांगितले. त्यासाठी दोन दिवसांत पावती देऊ, असे सांगितले. शिराळ हे ओळखीचे असल्याने अंधारे यांनी त्यांच्यावर विश्‍वास ठेवला. त्यानंतर आठवड्याने  मी संतोष बागमार यांना तूर ठेवल्याची पावती मागितली. परंतु बागमार यांनी  तुमचा माल ठेवल्याची पावती  किरण शिराळ यांच्याकडे दिली, असे सांगितले. पुन्हा मी शिराळ यांच्याकडे पावतीची मागणी केली तर त्यांनी पावती घरी आहे नंतर देतो, असे सांगितले. 

परंतु 23 मार्च 2020 पासून लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे अंधारे यांना बार्शीला जाता आले नाही. लॉकडाऊन संपल्यावर दोघांनाही पावती मागितली. पंरतु पावती माझ्याकडे सुरक्षित आहे, काळजी करू नका असे सांगत वेळ मारून नेली. ते पावती देतील असे वाटले,  पण ती त्यांनी दिलीच नाही. दरम्यान, तुरीचा भाव रूपये 7300 झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर मी किरण शिराळ यांना भेटण्यासाठी त्यांच्या दुकानात गेलो, परंतु दुकान बंद होते.

मी संतोष बागमार वेअर हाऊसला तूर मार्केटला आणण्यासाठी गेलो. पण त्यांनी तूर देण्यास नकार दिला. त्यानंतर  किरण शिराळ यांच्या घरी जाऊन त्याची चौकशी केली. परंतु त्यांच्या कुटुंबियांनीही उडवाउडवाची उत्तरे दिली. किरण यांचा ठावठिकाणा माहीत नसल्याचे सांगितले. पुन्हा संतोष बागमार यांच्याकडे  मालाची चौकशी केली. त्यांनी त्यांच्या नोंदीप्रमाणे तूर नोंद गोडावून किपरकडे असल्याचे दाखविले. मात्र त्यातील 10 फेब्रुवारी 2020 रोजीची 10 टन 385 किलो तूर ठेवल्याची नोंदच दाखविली नाही. त्यामुळे फसवणुकीबद्दल वेअर हाऊस मालक व्यापार्‍यावर बार्शी तालुका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे.