Sat, Aug 08, 2020 14:20होमपेज › Solapur › भगवंत प्रगटदिन उत्साहात - बार्शीचे वैशिष्ठ्यपूर्ण भगवंत देवस्थान

भगवंत प्रगटदिन उत्साहात - बार्शीचे वैशिष्ठ्यपूर्ण भगवंत देवस्थान

Published On: May 16 2019 9:49AM | Last Updated: May 16 2019 11:58AM
बार्शी : प्रतिनिधी

बार्शीमध्ये श्री भगवंत प्रकटोत्‍सवानिमित्‍त भगवंत देवस्‍थान ट्रस्‍टकडून  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्‍याचा आज मुख्य दिवस असल्‍याने भाविकांनी सकाळपासूनच मंदिरात गर्दी केली आहे.  बार्शीतील भगवंत विष्णू हा द्वारकेनंतर दुसरा मानला जातो. पंढरपूरला एकदशीचे जसे महत्वा आहे तसे बार्शीला द्वादशी महत्वाची मानली जाते. पंढरपूरला एकादशी साजरी करुन बार्शीला द्वादशीचे पारणे करण्याची प्रथा आहे. बार्शीला भारतातील भूवैकुंठ असेही मानण्यात येते. येथील भगवंताच्या मूर्तीचे वैशिष्ठ्य म्हणजे ही मूर्ती दुहेरी अशी आहे. या भगवंताच्या मूर्तीच्या बरोबर मागे महालक्ष्मीची मूर्ती आहे. ही मूर्ती समोरून दिसण्यासाठी भगवंताच्या डाव्या बाजूला मागे आरसा बसवण्यात आला आहे. या आरश्यातच ही लक्ष्मीची मूर्ती भक्ताला दिसते. भगवंताबरोबरच या लक्ष्मीचीही पूजा करण्यात येते. ही संपूर्ण मूर्ती शाळीग्रामची आहे. भगवंताने शंख, चक्र, गदा आणि कमळ धारण केले आहे. तसेच या मूर्तीच्या छातीवर भ्रुगू ऋषीची पाऊल खूण असून मस्तकावर शिवलिंगही दिसून येते. अत्यंत वैशिठ्यपूर्ण अशी ही मूर्ती असून या देवस्थानच्या मागे काही आख्यायिकाही सांगितल्या जातात. त्यामध्ये राजा अंबरिशाची आख्यायिका अधिक लोकप्रिय आहे. इंद्र देवाच्या सांगण्यावरुन भगवंत भक्त राजा अंबरिशाचा नायनाट करण्याचे दुर्वास ऋषी प्रयत्न करत होते. त्यावेळी राजाने भगवंताचा धावा केला असे मानण्यात येते. त्यानंतर भगवंत प्रगट झाले आणि त्यांनी दुर्वासांवर सुदर्शन चक्र सोडले. त्याला घाबरुन दुर्वासांनी भगवान शंकराचा धावा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे शंकरांनी सुदर्शन चक्र शांत करुन दुर्वासांचा जीव वाचवला अशी ही आख्यायिका सांगण्यात येते. त्यावेळी प्रगटलेल्या भगवंताचा वास इथे आहे असे मानण्यात येते.

श्री भगवंत प्रकटोत्‍सवानिमित्‍त बार्शीमध्ये भगवंत देवस्‍थान ट्रस्‍टकडून १० मे पासून १५ मे पर्यंत विविध धार्मिक आणि सांस्‍कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. भगवंत मैदानावर रात्री ८ वाजता शोभेच्या फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात येणार आहे. भगवंत देवस्‍थान ट्रस्‍टकडून आयोजित केलेल्‍या विविध सांस्‍कृतीक कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्‍यावा असे ट्रस्‍टकडून आवाहन करण्यात आले आहे. 

देवस्थानचा विकास करुन भक्तांच्यासाठी सुविधा करण्यात याव्यात अशी मागणी येथील स्थानिक तसेच येथे द्वादशी निमित्त येणाऱ्या आणि राज्याच्या अनेक भागातून येऊन येथून चालत पंढरपूरला जाणाऱ्या भक्तांनी केली आहे.