Fri, Feb 26, 2021 07:23
लॉकडाऊनसंदर्भात आज पालकमंत्र्यांची बैठक

Last Updated: Feb 24 2021 2:32AM

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा     

सोलापूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी लॉकडाऊन करावे, संचारबंदी करावी का, यासदंर्भात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी (दि. 24) बैठक बोलावली आहे. येथील जिल्हा नियोजन भवन येथे 12.30 वाजता ही बैठक होणार असून ते जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी, लोकप्रतिनिधींकडून आढावा घेणार आहेत.  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना कोरोना झाल्याने गंभीर दखल घेत त्यांनी ही बैठक बोलावल्याची चर्चा आहे.

यावेळी जिल्ह्यातील औषधांची परिस्थिती काय, हॉस्पिटल आणि तेथील बेडची संख्या किती आहे  याची माहिती घेण्यात येणार आहे.  वेळ आली तर संचारबंदी लागू करण्यासाठीची तयारी आहे की नाही याची चाचपणी करण्यासाठी ते जिल्ह्यातील आमदार आणि खासदारांची मते जाणून घेणार आहेत. 

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यादृष्टीने ठोस नियोजन केले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापूर शहर-जिल्ह्यातील नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग राखणे, मास्कचा वापर आणि स्वच्छता या नियमांचे पालन करण्याचे आवाहन सातत्याने केले जात आहे. सध्या लॉकडाऊन करण्याचा कोणताही विचार नाही. पोलिस व महसूल, महापालिका, जिल्हा परिषद प्रशासनाने रुग्ण वाढू नयेत म्हणून चांगले नियोजन केले आहे. मात्र अनेक नागरिकाकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. त्यांच्यावर  कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या आहेत.

सोलापूरशेजारील जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. या पार्श्‍वभूमीवर परजिल्ह्यांतून तथा परराज्यांतून येणार्‍या नागरिकांची वैद्यकीय तपासणी करता येईल का, एस.टी. स्टँडवर येणार्‍या प्रवाशांचेही थर्मल स्क्रिनिंग करणे, गर्दीचे नियोजन करणे, औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे का, रुग्णालयांमधील कोरोना रुग्णांच्या राखीव बेडची स्थिती काय आहे, याचाही आढावा ते घेणार आहेत. लसीकरणाची स्थिती, लॉकडाऊन करण्याबाबत लोकप्रतिनिधींचे मत काय, अशा विविध विषयांवर ही बैठक बोलावण्यात आली आहे. 

या बैठकीसाठी पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त,  पोलिस अधीक्षक यांच्यासह सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक, महापालिका व जिल्हा परिषदेचे आरोग्याधिकारी, शिक्षणाधिकार्‍यांना बोलावण्यात आले आहे. बैठकीसाठी खासदार व आमदारांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. पालकमंत्री या बैठकीत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.