Tue, Sep 29, 2020 18:39होमपेज › Solapur › ...तर ‘एफआरपी’ व्याजाने वसूल! : जिल्हाधिकारी 

...तर ‘एफआरपी’ व्याजाने वसूल! : जिल्हाधिकारी 

Published On: Jun 12 2018 12:54AM | Last Updated: Jun 12 2018 12:13AMसोलापूर ः प्रतिनिधी 

सोलापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांना उसाच्या एफआरपीचे पैसे दिले नाहीत. त्यामुळे लाखो शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपये साखर कारखानदारांकडे अडकून पडले आहेत. याविषयी सातत्याने पाठपुरावा होणे अपेक्षित असतानाही  शेतकरी संघटना गप्प बसल्या आहेत. त्यामुळे एफआरपीचे पैसे कधी मिळणार, असा सवाल शेतकर्‍यांनी उपस्थित केला असतानाच, कारखान्यांनी तातडीने पैसे द्यावेत; अन्यथा नियमाप्रमाणे 15 टक्के व्याजदराने पैसे वसूल करावे लागतील, असा इशारा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिला आहे.

ऊस गाळपासाठी आणल्यानंतर किमान 15 दिवसांत शेतकर्‍यांच्या उसाचा हप्ता त्यांच्या खात्यांवर जमा करणे अपेक्षित आहे. मात्र, अनेक साखर कारखान्यांनी वेगवेगळे दर दिले आहेत. त्यामुळे काही साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांचे पैसे दिले असले, तरी अनेक साखर कारखान्यांकडे शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपये अडकून पडले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांची बाजू घेणार्‍या शेतकरी संघटनाही सध्या मूग गिळून गप्प बसल्या आहेत. तर शासनही यावर मार्ग काढण्यास तयार नाही. त्यामुळे शेतकर्‍यांची सध्या दयनीय अवस्था सुरू झाली आहे.

कारखान्यांना व्याज भरावेच लागेल!

शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपये साखर कारखानदारांकडे लटकून पडले आहेत. तर जिल्ह्यातील साखर कारखानदारांना शेतकर्‍यांचे पैसे द्यावेच लागतील. जर हे पैसे शेतकर्‍यांना वेळेवर दिले नाहीत, तर त्यावर 15 टक्के व्याजदराने आकारणी होते. जेवढ्या दिवस ही रक्‍कम थकीत राहील, तेवढे व्याज कारखानदारांना मोजावे लागेल, असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले