सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
सोलापूर जिल्ह्यात होत असलेल्या 658 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठीच्या प्रचार तोफा बुधवारी सायंकाळी पाच वाजता थंडावल्या. शुक्रवारी (दि.15) मतदान होणार असून सोमवार, 18 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या 10 दिवसांपासून विविध पॅनेलच्या गटांतर्फे जोरदार प्रचार सुरू होता. जिल्ह्यातील निवडणुका होत असलेल्या 658 ग्रामपंचायतींपैकी 54 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून उर्वरित ग्रामपंचयातींसाठी शुक्रवार, 15 रोजी मतदान आणि 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. 658 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 21 हजार 32 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी विविध ग्रामपंचायतींमधून 6 हजार 992 जणांनी अर्ज माघार घेतले आहेत. 6 हजार 301 जागांसाठी 14 हजार 38 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ग्रामपंचायत निवडणुका चुरशीने होत आहेत.
गावातील स्थानिक पातळीवर गटा- तटाच्या राजकारणाला वेग आला आहे. मतदारांनी या मतदान प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन निवडणूक कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे. यंदा ग्रामपंचायत सरंपचपदाचे आरक्षण शुक्रवार, 22 जानेवारी रोजी काढण्यात येणार आहे.