Sat, Aug 15, 2020 14:15होमपेज › Solapur › सिकंदराबाद एक्स्प्रेसवर दरोडा टाकणार्‍या पाचजणांच्या मुसक्या आवळल्या

सिकंदराबाद एक्स्प्रेसवर दरोडा टाकणार्‍या पाचजणांच्या मुसक्या आवळल्या

Published On: Nov 26 2018 1:25AM | Last Updated: Nov 25 2018 10:24PMकरमाळा : तालुका प्रतिनिधी

राजकोट-सिकंदराबाद एक्स्प्रेसवर दरोडा टाकून प्रवाशांना लुटणार्‍या दरोडेखोरांच्या टोळीतील दहापैकी पाचजणांच्या मुसक्या आवळण्यात दौंड लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. या पाचही संशयितांना लोहमार्ग  न्यायालयात उभे केले असता 26 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

पाचजणांना अटक केली असली तरी इतर पाचजण मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. कापर्‍या उर्फ कापूर शेठ भोसले (वय 55), सोन्या उर्फ संजू काळे (वय 20), संदेश मच्छिंद्र काळे (वय 20), कबुतर्‍या उर्फ सुजित राजू काळे (वय 20, सर्व रा. भगतवाडी, ता. करमाळा) तसेच निलेश बंडू काळे (वय 40, रा. कर्जत, जि. नगर) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. 

ही कारवाई गुन्हे अन्वेषण शाखा पुणे, दौंड, अहमदनगर तसेच आरपीएफचे पोलिस निरीक्षक शिरपोर, पोलिस  निरीक्षक एस.एस. लोंढे, आरपीएफ क्राईम ब्रँचचे प्रदीप गोयेकर, संजय पाचपुते, मनोज साळवे, सरफराज खान, श्रद्धा पठारे आदींच्या संयुक्त पथकाने केली आहे.

भिगवण (ता. इंदापूर) जिल्हा पुणे रेल्वेस्थानकजवळ राजकोट-सिकंदराबाद एक्स्प्रेसवर पडलेल्या दरोडाप्रकरणी पोलिसांनी या संशयितांना अटक केलेली आहे. या सर्वांना शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. 

रेल्वेचे पोलिस अधीक्षक दीपक साकोरे, सहाय्यक अधीक्षक तुषार पाटील, उपविभागीय अधिकारी नंदकुमार घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेशसिंग गौड यांच्या नेतृत्वाखाली आरपीएफ व रेल्वे पोलिसांचे स्वतंत्र  पथक तयार करण्यात आले होते.  यातच कुर्डुवाडी ते भिगवण यादरम्यान अनेकवेळा रेल्वे थाबंवून  किंवा क्रॉसिंगला थांबलेल्या रेल्वेमधील प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याचे प्रमाण प्रचंड वाढले होते. 

सोलापूर-दौंड, दौंड, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर या रेल्वेमार्गावर दरोडेखोरांच्या टोळीने रेल्वे सिग्नल तारा तोडून गाड्या थांबवून रेल्वेगाड्यांमधील प्रवाशांना धाक दाखवून लुटालूट करून किंमती ऐवज लंपास करून थैमान घातला होता. त्यामुळे दरोडेखोरांच्या तपासासाठी हे स्वतंत्र पथक भिगवण, कुर्डुवाडी, काष्टी, श्रीगोंदा आदी रेल्वेमार्गांवर पाठवले होते. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसारनुसार दौंड-सोलापूर रेल्वेमार्गावरील व करमाळा तालुक्यातील जिंती  रेल्वे स्टेशनपासून आत दोन किलोमीटर अंतरावर  झोपड्यात संशयित दबा धरून बसल्याचे आढळून आले होते. यावेळी चौकशी केली असता  सिकंदराबाद एक्स्प्रेस दरोड्यामधील संशयित आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी पोलिसी कारवाईचा अंदाज घेऊन पाच संशयित मात्र फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. या फरार आरोपींचा तपास पोलिस करीत आहेत.  या मार्गावर गस्त वाढवण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांनी सांगितले.