Wed, May 19, 2021 04:25
७९ रुग्णालयांचे फायर, स्ट्रक्चरल ऑडिट 

Last Updated: May 05 2021 2:24AM

सोलापूर  : पुढारी वृत्तसेवा      

कोरोनामुळे सर्वत्र हॉस्पिटल्स फुल्ल आहेत. अशा परिस्थितीत अनेक हॉस्पिटलमध्ये दुर्घटनांनी रुग्ण, नातेवाईकांचे बळी गेले आहेत. या पार्श्वभूमीवर आपत्कालिन प्रसंग उद्भवू नये यासाठी जिल्ह्यातील जवळपास 79 रुग्णालयांचे फायर आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. त्यामध्ये सूचविलेल्या त्रुटी आठ दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, गेल्या चार- पाच महिन्यांत राज्यातील अनेक रुग्णालयांमध्ये अचानक आग लागणे, इमारत कोसळणे, विद्युतपुरवठा खंडित होणे असे प्रकार घडले आहेत. अचानक उद्भवलेल्या या प्रसंगावेळी रुग्णालयातील रुग्णाबरोबर त्या ठिकाणी काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या जीविताला ही धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

यापूर्वी अनेक ठिकाणी घडलेल्या घटनेत अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ती परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यात निर्माण होऊ नये यासाठी जिल्ह्यातील इंजिनिअरिंग महाविद्यालये तसेच पॉलिटेक्निक महाविद्यालयातील नवोदित अभियंत्या मार्फत जिल्ह्यातील 79 रुग्णालयातील फायर ऑडिट तसेच त्या रुग्णालयाच्या इमारतीचे स्ट्रक्चरल अ‍ॅडिट करण्यात आले आहे. ऑडिट कमिटीने अनेक ठिकाणी काही त्रुटी काढल्या आहेत.काही ठिकाणी तात्काळ दुरुस्त्या सूचविल्या आहेत. त्यामुळे त्या त्रुटी येत्या आठ दिवसात पूर्ण कराव्यात अशा दिल्या आहेत. अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक वायरिंग दुरुस्ती सूचविली आहे. अनेक ठिकाणी फायर कंन्ट्रोलिंग युनिट अद्यावत करण्याच्या सूचना या कमिटीने दिल्या आहेत.

सिव्हिल हॉस्पिटलचेही होणार अ‍ॅडिट...

शंभरकर म्हणाले, सध्या सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात कोव्हिड रुग्णांची संख्या 500 च्या पुढे गेली आहे. तसेच, या ठिकाणी नॉन कोव्हिड रुग्णांची संख्या ही मोठी आहे. त्यामुळे या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी तत्काळ फायर अ‍ॅडिट आणि स्ट्रक्चरल अ‍ॅडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत.