सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
तत्कालीन जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार यांची पुण्याला बदली झाल्यापासून कृषी अधीक्षकाचे पद रिकामेच आहे. गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हा कृषी अधीक्षकांचा भार अतिरिक्तकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांना अडचणी निर्माण होत आहेत.
कृषी उपसंचालक रविंद्र माने यांच्याकडे कृषी उपसंचालकांचा पदभार देण्यात आला होता. परंतु जिल्हा कृषी अधीक्षकपदी बिराजदार यांची बदली झाल्याने त्यांच्याजागी माने यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यात कृषी विस्ताराच्या विविध योजना राबविण्यात येतात. मात्र या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या मुख्य जिल्हा कृषी अधीक्षकाचा पदभार गेल्या तीन महिन्यांपासून रिकामा आहे. त्यामुळे कार्यालयातील कर्मचार्यांची आणि शेतकर्यांची मोठी अडचण निर्माण होत आहे. मुख्य जिल्हा कृषी अधीक्षक यांच्यासह कृषी विभागातील अनेक पदे गेल्या कित्येक महिन्यांपासून रिकामी आहेत. एका कृषी सेवकाकडे 6 ते 7 गावे देण्यात आली आहेत. त्यामुळे गावामध्ये शेतकर्यांना कृषी विभागाच्या योजनांबाबत माहिती मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. याशिवाय कृषी विभागातील कार्यालयातील कर्मचार्यांच्यादेखील अडचणी निर्माण होत आहेत.
शेतकर्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी कृषी विभागाकडून अनेक योजना राबविल्या जातात. त्या शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य शेतकर्यांपर्यंत गेल्या तरच त्याचा फायदा होणार आहे. मात्र सध्या मुख्य कृषी अधीक्षकाचे पद आणि इतर रिक्त पदामुळे कृषी विभाग मेटाकुटीला आले असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अलीकडे कृषी क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञान अवजारांच्या साह्याने श्रम व मनुष्यबळ कमी झाल्याने शेतकर्यांनी विशेष लक्ष दिले आहे. सध्या बेरोजगारीचा मुद्दा समोर असल्याने युवापिढीही कृषी क्षेत्राला रोजगार म्हणून बघत आहे.
शासनाच्या विविध प्रकारच्या योजना या शेतकरी आणि शासन यामधील महत्त्वाचा दुवा समजल्या जातात. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी युवापिढीतील शेतकरी धडपड करीत आहेत. मात्र गावातील कृषी सेवकांपासून कृषी अधीक्षकांपर्यंत अनेक पदे रिकामी असल्यामुळे शेतकर्यांना अडचणी निर्माण होत आहेत.