Sat, Aug 15, 2020 12:44होमपेज › Solapur › करमाळ्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

करमाळ्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Published On: Sep 17 2018 1:25AM | Last Updated: Sep 16 2018 9:27PMकरमाळा : अशोक नरसाळे

करमाळा परिसरामध्ये पावसाविना खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे.  तालुक्यातील 118 गावांपैकी 50 गावांची पीकपाणी आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आहे. त्यामुळे या गावांमध्ये दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

पावसाने पाठ फिरवली

रब्बी हंगामाच्या ज्वारीच्या पेरणीचा मुहूर्त टळून गेल्यानंतर आठ दिवस उलटून गेले तरी अद्यापपर्यंत करमाळा तालुक्याकडे पावसाने पूर्णपणे पाठ फिरवलेली आहे. पावसाची वाट पाहताना तालुक्यातील बळीराजा आकाशाकडे मोठ्या आशेने वाट पाहत आहे. तालुका दुष्काळी जाहीर करावा, तालुक्यामध्ये टँकरने पाणी पुरवठा चालू करावा, जनावरांना जगवण्यासाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, अशा प्रकारची रास्त मागणी ग्रामीण भागातील हतबल झालेल्या शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

आणेवारी घटली

करमाळा तालुक्यामध्ये 105 ग्रामपंचायती असून 118 गावांचा समावेश तालुक्यामध्ये आहे. त्यामध्ये फक्त पश्‍चिम भागातील 30 गावे ही उजनी धरण काठच्या जवळ येत असल्यामुळे या गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न नाही. 

धरण काठावरून शेतकर्‍यांनी पर्यायी व्यवस्था करून आपली उपजिविका भागवण्यासाठी पर्याय शोधलेले आहेत. मात्र, उर्वरित 90 गावांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती असून 90 गावांपैकी शासन स्तरावर 40 गावांमध्ये पीक पाण्याची आणेवारी ही 50 पैसेपेक्षा कमी आहे. त्यामुळे या गावामध्ये शासनानेच दुष्काळ जाहीर केलेला आहे. तर उर्वरित 50 गावांमध्ये पीक पाण्याची आणेवारी शासन स्तरावर 50 पैशांपेक्षा जास्त लागलेली असली तरी या गावांमध्ये खरीप व रब्बी हे दोन्हीही हंगाम सध्या पूर्णपणे वाया गेल्यामुळे याही गावामध्ये वस्तुस्थिती पाहता पीक पाण्याची आणेवारी ही 50 पैसे पेक्षाही कमी दर्शवत आहे. त्यामुळे या गावात पण शासनाने दुष्काळ जाहीर करावा, अशा प्रकारची मागणी शेतकरीवर्गाकडून केली जात आहे.

दुष्काळाची भीती

यावर्षी खरीप व रब्बी हे दोन्ही हंगाम वाया गेल्यामुळे सन 1972 पेक्षा भीषण दुष्काळ तालुक्यामध्ये पहावयास मिळणार आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सन 1972 चा दुष्काळ हा पाण्याचा नव्हता, तर तो जनावरांच्या चार्‍यांचा व अन्नधान्याचा होता. 1972 मध्ये सहजासहजी ग्रामीण भागामध्ये 10 ते 15 फुटांवर जमिनीमध्ये पाणी उपलब्ध होत असे. मात्र, दुष्काळामुळे नागरिकांना खाण्यासाठी व जनावरांना खाऊ घालण्यासाठी चारा उपलब्ध नव्हता. त्यावेळी मात्र तत्कालीन सरकारने ग्रामीण भागामध्ये रोजगार उपलब्ध करून शासनाकडून अन्नधान्य व जनावरांसाठी चार्‍याची सोय उपलब्ध करून दिलेली होती.

पाणीपातळी घटली

तालुक्यातील पश्‍चिम भागातील 30 गावे वगळता उर्वरित भागात जमिनीतील पाण्याची पातळी ही कमीत-कमी 300 फूट, तर जास्तीत-जास्त 500 फुटापर्यंत खोलवर गेलेली आहे. जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर गेल्यामुळे सध्या या परिसरातील विहिरींना बोअर, नदी, नाले, पाझर तलाव यामध्ये पाण्याची साठवण राहिलेली नाही. त्यामुळे खर्‍याअर्थाने चालू वर्षी पडत असलेला दुष्काळ हा अन्नधान्याचा नसून तो फक्त पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चार्‍याचा राहणार आहे.

पाझर तलाव कोरडे

करमाळा तालुक्यामध्ये मौजे मांगी, हिंगणी, वाशिंबे, म्हसेवाडी, भोसे, पारेवाडी, नेरले, वडशिवणे, वीट आदी गावांमध्ये असलेल्या पाझर तलावामध्ये पाण्याचा ठिपूर थेंबही नसून सध्या हे पाझर तलाव कोरडे आहेत. याशिवाय तालुक्यातील लहान-सहान गांवतळे पण पाण्याविना कोरडी आहेत. अशा परिस्थितीमध्ये शासनाने त्वरीत दुष्काळ जाहीर करावा, अशा प्रकारची रास्त मागणी शेतकरीवर्गाकडून केली जात आहे.