Wed, Jun 23, 2021 02:12
ट्रॅक्टरच्या धडकेत बालक ठार

Last Updated: Jun 11 2021 2:50AM

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

येथील दत्त चौकात दमाणी शॉपिंग सेंटरसमोर सायकलवरून निघालेला बालक समर्थ धोंडिबा भास्कर (वय 13, रा. पंजाब तालीम) ट्रॅक्टरच्या धडकेत ठार झाला. गुरुवारी (दि. 10) सकाळी 10.30  वाजण्याच्या सुमारासह हा अपघात झाला. याप्रकरणी ट्रॅक्टरचालक चिदानंद अशोक मलगोंडा (वय 25, रा. देगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत खराब रस्त्यांमुळे ही दुर्घटना घडल्याबद्दल नागरिकांतून संताप व्यक्‍त होत आहे. याबाबत माहिती अशी की, समर्थ हा सकाळी घराकडून लक्ष्मी मार्केटकडे निघाला होता. तो दत्त चौकातील दमाणी कॉम्प्लेक्सजवळ आला असता पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅक्टरने त्याला जोराची धडक दिली. यात ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाखाली सापडून समर्थ भास्कर हा बालक जागीच ठार झाला. 

अपघातानंतर ट्रॅक्टरचालक पळून गेला. अपघात पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती. यावेळी फौजदार चावडीचे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी तेथील गर्दी पांगविली व ट्रॅक्टर जप्त केला. पोलिसांंनी ट्रॅक्टरचालकाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आहे. अपघातानंतर मृताच्या नातेवाईकांनी, मित्रांनी व गवळी समाजबांधवांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली होती.