Mon, Apr 12, 2021 03:44
कळमण येथे दहावीच्या ७ विद्यार्थिनींना कोरोना

Last Updated: Apr 08 2021 2:05AM

उत्तर सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाचा विळखा अधिक वाढू लागला आहे. येथील कळमण (ता. उत्तर सोलापूर) येथे महात्मा गांधी विद्यालयातील दहावीच्या सात विद्यार्थिनींसह  शाळेतील एक शिक्षक, एक कर्मचारी असे एकूण नऊजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्याच्या तपासणी अहवालातून हे स्पष्ट झाल्याचे तालुका गट शिक्षण अधिकारी बापूसाहेब जमादार यांनी सांगितले. 

दरम्यान, यामुळे परिसरात खळबळ उडली आहे. दरम्यान, ज्या विद्यार्थिनींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे त्यांची आरटीपीसीआर तपासणीसाठी नमुने घेण्यात आल्याचे जमादार यांनी सांगितले. शासनाच्या आदेशानुसार दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तोंडावर प्रात्यक्षिक तसेच 50 टक्के उपस्थितीनुसार अध्ययनाच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार येथील महात्मा गांधी विद्यालयात विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू आहेत.

दरम्यान, या शाळेच्या दहावीच्या मुलींच्या वर्गातील एका मुलीला सर्दी, खोकल्याचा त्रास होत होता. त्यामुळे तिची प्राथमिक आरोग्य केंद्रात रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. त्यात तिला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा हादरली. हा प्रकार उत्तर तालुका आरोग्य अधिकारी श्रीकांत कुलकर्णी व तालुका गटशिक्षणाधिकार्‍यांनी बुधवारी शाळेला भेट दिली. त्यावेळी यांनी सर्वांची आरोग्य तपासणी केली. यामध्ये संबंधित मुलीच्या संपर्कातील आलेल्या प्रामुख्याने दहावीच्या वर्गातील 27 मुलींची तपासणी केली. तेव्हा अन्य सहा मुलीही पॉझिटिव्ह आढळून आल्या. तेसच एक शिक्षक आणि कर्मचारीही पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे प्रशासन आणखी हादरले. त्यांनी या सर्वांना त्यांच्या त्यांच्या स्वत:च्या घरामध्ये होम क्वारंटाईन केले. पण त्यांना कुठलाही सध्या त्रास व लक्षणे नसल्याचे कुलकर्णी, जमादार यांनी सांगितले. तसेच 20 निगेटिव्ह आलेल्या मुलींचे आरटीपीसीआर नमुनेही तपासणीसाठी घेतले. त्यांचाही गुरुवारी अहवाल येईल, असे ते म्हणाले.

आता अन्य विद्यार्थ्यांचे काय?

शाळेतील विद्यार्थी कोरोना  बाधित सापडल्याने शाळेत विद्यार्थ्यांना बोलवायचे का? असा प्रश्न शिक्षण विभागात समोर पडला आहे. त्यामुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांबाबत सरकारने योग्य तो निर्णय घेणे अपेक्षित आहे. या महिन्यात दहावी व बारावीच्या परीक्षा आहेत. शाळेत बोलून काही उपयोग नसून विद्यार्थ्यांना घरी बसूनच अभ्यास करायला लावावा, असा सूर पालकांमधून होत आहे.