Wed, Jun 23, 2021 02:08होमपेज › Solapur › पंढरीत ‘कार्तिकी’साठी 4 लाख वैष्णवांचा मेळा

पंढरीत ‘कार्तिकी’साठी 4 लाख वैष्णवांचा मेळा

Last Updated: Nov 09 2019 2:05AM
पंढरपूर : प्रतिनिधी

शुक्रवारी (दि. 8) कार्तिकी यात्रेसाठी आलेल्या सुमारे चार लाखांहून अधिक भाविकांच्या उपस्थितीत कार्तिकी एकादशीचा सोहळा उत्साहात झाला. चंद्रभागा स्नानानंतर हरिनामाचा जयघोष करीत भाविकांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले. दर्शन रांगेतही भाविक मोठ्या संख्येने उभारल्याने व 65 एकर भाविकांनी फुलल्याने पंढरीनगरी दुमदुमली आहे. दरम्यान, राज्यभरात झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्याचा आणि एकादशीदिवशी बेळगावच्या 5 वारकर्‍यांच्या अपघाती मृत्यूचे यात्रेवर सावट पडल्याचे दिसून आले. 

वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान असलेल्या पंढरीनगरीत कार्तिकी वारी एकादशी सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यांतून मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. पहाटेपासूनच भाविकांनी चंद्रभागा स्नान करीत श्री विठ्ठलाचे मुखदर्शन व पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. दिंड्या, पताका, टाळ, वीणा, डोक्यावर तुळशी वृंदावन अशा वेशातील लाखो भाविकांच्या उपस्थितीने मंदिर परिसर, चौफळा, भक्‍तीमार्ग, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, दर्शन रांग, 65 एकर गजबजून गेले आहे. शहरातील सर्व मठ, मंदिरे, धर्मशाळांतून भाविकांची गर्दी झाली आहे. मठ, मंदिरांतून हरिनामाचा जयघोष आणि कीर्तन, प्रवचनाचे सूर कानावर पडत आहेत. सावळ्या विठ्ठलाच्या भेटीसाठी आलेल्या भाविकांनी मोठ्या 

भक्‍तीभावाने वारी पोहोचवली आहे. पहाटे श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सपत्नीक व मानाचे वारकरी सुनील ओमासे व नंदा ओमासे (रा.बेडग, ता. मिरज) यांच्या हस्ते करण्यात आली.  मंदिर समितीच्या वतीने भाविकांसाठी दर्शन रांगेत फराळाची व्यवस्था केली होती. तसेच  वॉटरप्रुफ दर्शन रांग उभारण्यात आली असून शुद्ध पिण्याचे पाणी, वीज, शौचालय, प्रथमोपचार केंद्र, पोलिस संरक्षण, आपत्कालीन मदत केंद्र आदी अत्यावश्यक सेवासुविधा पुरवण्यात आल्या आहेत.  

65 एकर येथेही उभालेल्या तंबू व राहुट्यांमधून भजन, कीर्तन व प्रवचनात भाविक दंग असल्याने 65 एकर येथील वातावरण भक्‍तीमय झाले आहे. वाखरी येथील जनावरांच्या बाजारातही देशी गाय, खिलार, जर्सी, पंढरपुरी म्हैस, खोंड आदी जनावरांचा बाजार भरल्याने या बाजाराकडेही भाविक भेटी देत होते, बाजारातही  सुमारे 2 कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून तीर्थक्षेत्र पोलिस संकल्पना फायदेशीर ठरत आहे.

त्यामुळे कार्तिकी यात्रेला भाविकांची संख्या वाढेल, असा प्रशासनाचा अंदाज असतानाच भाविकांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले. राज्यात परतीच्या पावसाने उभी पिके व फळबागा यांचे प्रचंड नुकसान झाले असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असल्याने  वारकर्‍यांची संख्या यावर्षी कमी झाल्याचे दिसून आले. 

5 वारकर्‍यांच्या मृत्यूने ‘कार्तिकी’ दु:खाचे सावट

कार्तिकी यात्रा वारकर्‍यांसाठी जिव्हाळ्याचा, आत्मीक आनंदाचा क्षण असतो. याच आनंदाच्या दिवशी पंढरीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील 5 वारकर्‍यांवर काळाने घाला घातला. या दुर्घटनेमुळे संपूर्ण कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यावर दु:खाचे सावट पसरले असल्याचे दिसून आले.