सातारा : पुढारी वृत्तसेवा
राजवाडा परिसरात मंगळवारी दुपारी दोघांनी कोयतासारख्या धारदार शस्त्राने एकावर हल्ला केला. गंभीर जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेने परिसर हादरून गेला असून, भीतीचे वातावरण निर्माण झाले.
सुधीर किसन देसाई (वय 47, रा. पुनवडी, ता. सातारा) असे हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मंगळवारी दुपारी सुधीर देसाई राजवाडा परिसरात कामासाठी आले होते. दीड वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी युवक आले व त्यांनी देसाई यांना घेरले. वाद घालण्यास सुरुवात केली. यामुळे परिसरात बघ्यांची गर्दी झाली. वादावादी सुरू असतानाच अचानक संशयित युवकांनी कोयत्यासारखे धारदार शस्त्र बाहेर काढले व त्यांनी हल्ला चढवला. पायावर वर्मी घाव बसल्याचे समोर आले आहे. अवघ्या पाच मिनिटांत घडलेल्या या थरारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. हल्लेखोरांनी हल्ला केल्यानंतर पलायन केले.राजवाडा परिसरात धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची माहिती शहरात वार्यासारखी पसरली.
जखमी झालेल्या देसाई यांना उपचारासाठी सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले. हल्ल्याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली. देसाई यांच्या कुटुंबियांना समजल्यानंतर ते सिव्हिलमध्ये दाखल झाले. उपचारानंतर जिल्हा रुग्णालयातील पोलिस त्यांचा जबाब घेत होते. रात्री उशीरापर्यंत याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.