Tue, Aug 04, 2020 10:43होमपेज › Satara › सातारा जिल्ह्यात ४०३ गावे कोरोनाग्रस्त

सातारा जिल्ह्यात ४०३ गावे कोरोनाग्रस्त

Last Updated: Jul 11 2020 1:25AM
सातारा : टीम पुढारी

जिल्ह्यात  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अक्षरश: हाहाकार उडाला आहे. जिल्ह्यातील 1 हजार 739 गावांपैकी तब्बल 403 गावांत कोरोनाचे रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. कराड, सातारा, पाटण, जावली, वाई, फलटण हे तालुके कोरोनाचा हॉटस्पॉट बनले आहेत. आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांपैकी तब्बल 73.89 टक्के रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत चालली असून शहरी भाग कोरोनाने व्यापला आहे. मुंबई, पुणे या रेडझोनमधून आलेल्यांमुळे जिल्ह्यात घबराट पसरली आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढत चालला असून शहरी व ग्रामीण भागाला या कोरोनाने विळखा घातला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वाधिक म्हणजे 1 हजार 319 रुग्ण आढळून आले आहेत. नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात 224 रुग्ण आढळले आहेत. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात रुग्ण संख्या आधिक असून कोरोना संसर्गाचे प्रमाणही या भागात वाढू लागले आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा हजारी पार करून पुढे गेला आहे.403 गावे कोरोना बाधित झाली आहेत.

.परराज्य, परजिल्हा व विदेशातून आपल्या मूळ गावी परतलेल्या मूळनिवासीतांची संख्या जिल्ह्यात आधिक आहे. यातील बहुतांश जणांना कोरोनाची बाधा झाली असून यातील अनेकजण ग्रामीण भागात राहणारे आहेत. त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव  झाला आहे. शहरीबाबूमुळे संसर्गही झपाट्याने झाल्याने ग्रामीण भागात अनेक गावे कोरोनाचे हॉटस्पॉट बनली आहेत. कराड तालुक्यातील 67 गावांतील 386 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. या तालुक्यातील तारुख 46 व वनवासमाची येथे 40 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर सातारा तालुक्यातील जिहे गावामध्ये तब्बल 54 कोरोना बाधित सापडले आहेत.