Sun, Sep 20, 2020 11:08होमपेज › Satara › सातार्‍यात डॉल्बी वाजणारच; खासदार उदयनराजेंचे चॅलेंज video

सातार्‍यात डॉल्बी वाजणारच; खासदार उदयनराजेंचे चॅलेंज video

Published On: Sep 14 2018 4:34PM | Last Updated: Sep 14 2018 4:46PMसातारा : प्रतिनिधी

सातार्‍यातील मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन आमच्या मालकीच्या मंगळवार तळ्यात करण्याला माझी परवानगी असेल, तर जिल्हा प्रशासनाने हस्तक्षेप करायची गरज नाही. गणेश विसर्जन मंगळवार तळ्यातच होणार. बघू कोण आडवं येतंय? कोण आयजी? ते नांगरे-पाटील अटक करणार म्हणाले होते. अहो, अटक-बिटक सोडून द्या. मी पळपुटा वाटलो का? सातारकरांच्या सेवेसाठी काय वाट्टेल ते करू.  गणेश विसर्जन मंगळवार तळ्यातच होणार आणि सातार्‍यात डॉल्बी वाजणारच, असा पुनरुच्चार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी करत जिल्हा प्रशासनाला चॅलेंज केले.

सातार्‍यातील गणेश विसर्जनासंदर्भात नगरपालिकेत खा. उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांची बैठक झाली. यावेळी नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के,  नगरसेवक अ‍ॅड. डी. जी. बनकर, नगरसेविका सौ. स्मिता घोडके, अ‍ॅड. बाळासाहेब बाबर, प्रकाश गवळी आदि प्रमुख उपस्थित होते. खा. उदयनराजे म्हणाले,  अगोदरच करायला हवं होतं, अशी चर्चा काहीजण करत आहेत. पण चाळीस वर्षे तुमच्याकडे सत्‍ता होती त्या काळात तुम्ही केले असते तर सातार्‍याचा विकास झाला असता. 

खा. उदयनराजे म्हणाले,  मंगळवार तळ्याला आम्ही कधीच विरोध केला नाही. मंगळवार तळे मालकीचे असल्यामुळे विसर्जनाचे हे कोण ठरवणार? जलमंदिर तुमच्या मालकीचं नाही असं कुणी म्हटलं तर आम्ही काय नगरपालिकेच्या ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये झोपायचं? केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या नियमानुसार विसर्जनानंतर तळे स्वच्छ केले जाणार आहे.  कुठल्याही कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल होणार नाहीत.  आजपर्यंत मी काय पळपुटा वाटलो काय? पूर्वीही माझ्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.  कोर्ट ऑफ कंटेंम्ट झाला तर माझ्यावर होईल. मंगळवार तळ्याला पोलिस बंदोबस्त ठेवलाय पण मंगळवार तळ्यातच विसर्जन होणार आहे.  कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास त्याला नगरपालिका नव्हे तर जिल्हा प्रशासन जबाबदार असेल. पोलिसांमुळे जर मुर्तीची विटंबना झाली आणि त्यांनी मंडळांच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला तर मी आहेच. यासंदर्भात पुणे महसूल आयुक्‍तांशीही चर्चा झाली. गोडोली तळे पावसाळ्यात तुंबल्याने ‘मी कुणीतरी आहे,’ असे दाखवणार्‍यांनी त्यामध्ये सांडपाणी सोडले. अशा पाण्यात गणेश विसर्जन करणार आहे का? गणेश मंडळांच्या भावनांचा विचार करा. गोडोली तळ्यात विसर्जन व्यवस्था करता पण हे तळे जनावरांना पाणी पिण्यासाठी आणि शेती पाण्यासाठी राखीव आहे. त्याला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम लागू होत नाहीत का? दोन्ही तळ्यांसाठी नियम वेगळे आहेत का? गणेश विसर्जन मंगळवार तळ्यातच होणार, असा पुनरुच्चार खा. उदयनराजे यांनी केला. 

खा. उदयनराजे म्हणाले, कुणी सांगितलं उरमोडी, कण्हेर धरणात विसर्जन करा. पोलिस म्हणतायत मूर्ती आमच्या ताब्यात द्या. असे केले तर रुढी, परंपरा मोडीत काढण्याचा हा प्रकार आहे. मंगळवार तळ्यात पूर्वीपासून गणेश विसर्जन केले जात होते. जिल्ह्यात पूर्वीही कलेक्टर झाले. जिल्ह्यात कितीतरी कारखाने आहेत पण त्यांच्याकडे प्रदूषण नियंत्रित करणारी यंत्रणा आहे? खंडाळा, लोणंदमधील एमआयडीसीत टॉक्सिक वेस्ट मोठ्या प्रमाणावर नदीत मिसळत आहे. या प्रदूषणाकडे दुर्लक्ष का केले जाते? या प्रदूषणामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. इलेक्ट्रीक व्हेवचा आरोग्यावर परिणाम होत असल्याने मोबाईल टॉवर काढा. आवाजाची 75 डेसिबलची मर्यादा घालून दिली असली तरी त्यापेक्षा मोठा आवाज निर्माण करणारा ढोल ताशांचा आवाज आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी सोमवारी चर्चा करणार. 

नगरसेवक अ‍ॅड. डी. जी. बनकर म्हणाले, जिल्हा प्रशासनाने गणेश मंडळांना विश्‍वासात न घेता हिंदू धर्माच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केला त्याचा निषेध करतो. डॉल्बीसाठी सभापतींची घरे सील करण्यापर्यंत प्रशासनाची मजल गेली. आमच्या कोटाचा फास बसला तर ‘आ’ सुध्दा करु देणार नाही. बेताल वक्‍तव्य करु नका. विचार करुन बोला, असा इशारा  त्यांनी दिला.