Tue, Sep 29, 2020 19:41होमपेज › Satara › ऐतिहासिक निर्णयात सहभाग हे भाग्यच

ऐतिहासिक निर्णयात सहभाग हे भाग्यच

Published On: Dec 02 2018 1:46AM | Last Updated: Dec 01 2018 11:30PMसणबूर वार्ताहर

काँग्रेस - राष्ट्रवादीने मराठा समाजाला आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी झुलवतच ठेवले होते. मात्र कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून युती शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आपण मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सर्व आमदारांचे आभार मानतो, असे सांगत आ. देसाई यांनी या ऐतिहासिक निर्णयात सहभागी होता आले हे आपले भाग्यच आहे, असे प्रतिपादन आ. शंभूराज देसाई यांनी केले आहे.

नवारस्ता (ता. पाटण) येथे मराठा समाजाला  आरक्षण देण्याच्या शासनाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करण्यासाठी आयोजित आभार मेळाव्यात ते बोलत होते. प्रारंभी मानाचा फेटा बांधून आ. शंभूराज देसाई यांना युवकांनी पेढे व साखर भरवली. त्यानंतर मोटारसायकल रॅलीने आ. शंभूराज देसाई यांच्यासोबत हजारो युवक हे नवारस्ता येथील आभार कार्यक्रमस्थळी आले.

आ. देसाई म्हणाले, आघाडी सरकारने 2014 मध्ये निवडणुकीच्या तोंडावर घाईने आरक्षण दिले होते. मात्र याला कायदेशीर आधार नव्हता. त्यामुळे ते रद्द झाले. सातत्याने सत्तेत असूनही आघाडी शासनाला मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करता आल्या नव्हत्या. त्यामुळेच मराठा समाज लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरला. कायद्याच्या चौकटीत बसवून इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्यासाठी युती शासनाने शर्थीचे प्रयत्न केले आहेत.

‘केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’ अशी ज्यावेळी भाजप - शिवसेना युतीची भगवी लाट आल्याने मराठा समाजाला प्रश्‍न सुटण्याची आशा निर्माण झाली होती. आरक्षण देण्यासाठी मंत्री समितीला नव्हे, तर राज्य मागासवर्ग आयोगाला अधिकार असतात, याची साधी कल्पनाही आघाडी सरकारला नव्हती हे राज्याचे दुर्दैव आहे. कायद्याच्या चौकटीतील आरक्षणासाठी आम्ही उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्न केल्याचेही आ. देर्सा यांनी सांगितले. धनगर समाजाला आरक्षण देण्याचा प्रश्‍नही शासन येणार्‍या अधिवेशनात मांडणार असून हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा लागतो. तसेच मुस्लिम आरक्षणासाठी ही शासन सकारात्मक असल्याचे आमदार देसाई यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री यांना श्रेयच घ्यायचे असते तर...!

मराठा आरक्षणासाठी फार मोठे दिव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पार करावे लागले. विरोधकांना 20 वर्षात जमले नाही, ते अवघ्या 4 वर्षात त्यांनी करून दाखवले. मराठा आरक्षणाचे श्रेयच घ्यायचे असते तर मुख्यमंत्र्यांनी सभागृहात तासभर भाषण केले असते, असे सांगत आ. देसाई यांनी खोनोली येथील रोहन तोडकर यांच्या कुटुंबाला शासनाकडून सर्वोतोपरी मदत देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.