होमपेज › Satara › जिल्ह्याला पावसाचा दणका

जिल्ह्याला पावसाचा दणका

Last Updated: Oct 13 2020 2:17AM
सातारा : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. रविवारी दुपारपासून सर्वच तालुक्यांत हजेरी लावली असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिके वाया जाताना पाहून शेतकरी धास्तावला आहे. अनेक ठिकाणी ताली फुटून पिके वाहून गेल्याच्या घटना घडल्या. 

जिल्ह्यात ठिकठिकाणी रविवारी दुपारी मेघगर्जनेसह परतीच्या पावसाने हजेरी लावली. शनिवारी रात्रीही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. रात्रभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. रविवारी सकाळी सातार्‍यात पावसाने उघडीप दिल्यानंतर दुपारी 1 वाजल्यानंतर पुन्हा पावसाच्या जोरदार सरी कोसळण्यास सुरुवात झाली. रविवार हा बाजाराचा दिवस असल्याने अचानक सुरू झालेल्या पावसामुळे शहर व परिसरातील भाजी विक्रेत्यांसह रस्त्यावर विक्रीसाठी बसलेल्या व्यापार्‍यांची व ग्राहकांचीही चांगलीच तारांबळ उडाली. काही व्यावसायिकांचा मालही पावसामुळे भिजला. रविवारी कास, ठोसेघर, पाचगणी, महाबळेश्वर, बामणोली, तापोळा, सज्जनगड परिसरात पर्यटकांनी पावसाळी पर्यटनासाठी गर्दी केल्याचे  चित्र पहावयास मिळाले. अधून मधून पडणार्‍या पावसात अनेकांनी भिजण्याचा आनंद लुटला.

जिल्ह्यात रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत पडलेल्या पावसाची आकडेवारी याप्रमाणे : सातारा 23.41 मि.मी., जावली 38.3 मि.मी.,  पाटण 8.81 मि.मी., कराड 23.84 मि.मी., कोरेगाव  34.77 मि.मी., खटाव 30.03 मि.मी.,माण 27.14 मि.मी.,  फलटण 43.44 मि.मी., खंडाळा 62.6 मि.मी., वाई 37.85 मि.मी., महाबळेश्वर 29.13 मि.मी. अशी जिल्ह्यात एकूण 359.31 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातून देण्यात आली.

फलटण तालुक्याला वादळी वार्‍यासह पावसाने झोडपले असून हातातोंडाला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिके पाण्याखाली गेल्याने बळीराजा आर्थिक कोंडीत सापडला आहे.   माणच्या दुष्काळी पट्ट्यालाही झोडपून काढले. दोन दिवस झालेल्या पावसाने ओढे-नाले, बंधारे पूर्ण क्षमतेने वाहत असून या तालुक्यातील बहुतांश भागातील जलसाठेही हाऊसफुल्ल झाले आहेत. उत्तर कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रूकसह परिसराला शनिवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढले. रात्रभर पाऊस सुरूच राहिल्याने काढणीला आलेल्या बटाट्याचे मोठे नुकसान झाले. खटाव तालुक्याच्या उत्तर भागाला रविवारी सलग दुसर्‍या दिवशी तुफान पावसाने झोडपून काढले. शनिवारी मोळ, मांजरवाडी परिसरात एका तासात 62 मि.मी पावसाची नोंद झाली. ढगफुटी सद़ृश पावसाने ताली फुटून काही ठिकाणी शेते खरवडून गेली तर  सर्वत्र पाणी साठल्याने सोयाबीन, घेवडा आणि लागण केलेल्या कांद्याचे पिक पाण्याखाली गेले आहे.