Sat, Aug 08, 2020 15:02होमपेज › Satara › पवारांच्या बालेकिल्ल्यात फडणवीसांचा शिरकाव

पवारांच्या बालेकिल्ल्यात फडणवीसांचा शिरकाव

Published On: Jun 01 2018 2:14AM | Last Updated: Jun 01 2018 1:31AMसातारा : हरीष पाटणे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मसीहा असलेल्या शरद पवार यांच्या सातारा या बालेकिल्ल्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच शिरकाव केला आहे. राष्ट्रवादीचे खासदार असलेल्या उदयनराजे भोसले यांच्या भोवती पक्ष प्रवेशाचे जाळे टाकलेल्या  फडणवीसांनी सातारच्या मेडिकल कॉलेजला जागा मंजूर करुन सातारा जिल्ह्यात भाजपचा जोरदार मास्टर स्ट्रोक खेचला आहे. पाठोपाठ पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देवून  मोठी यशस्वी खेळी केली आहे.  फडणवीसांच्या या चाली राष्ट्रवादी काँग्रेससाठी धोक्याची घंटा आहे. 

स्व. यशवंतराव चव्हाण, किसनवीर आबा यांचा वारसा चालवणार्‍या सातारा जिल्ह्याने नेहमीच शरद पवार यांच्या बाजूने कौल दिला आहे. मात्र, अलिकडच्या दोन वर्षांत सातारा जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची एकमुखी हुकूमत होती. राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या या संस्थांमध्ये भाजपचा नेहमीच भोपळा असायचा. मात्र, या दोन वर्षांत जिल्हा परिषद, पंचायत समित्या व नगरपालिकांमध्ये भाजपने पाय रोवायला सुरुवात केली. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमधील अनेक हौशा नवशा गवशांनी काळाची पावले ओळखून सत्तेचे वारे खांद्यावर घेत भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना जे सतरंजा उचलायला असायचे ते भाजपच्या सत्तेच्या काळात प्रशासकीय अधिकार्‍यांना शासकीय विश्रामगृहावर येण्याचे फर्मान धाडत आहेत.  भाजपच्या सत्तेने असा विकेंद्रीकरणाचा मोठा स्पेस भरुन काढला आहे. जिल्ह्याच्या प्रशासकीय कार्यालयांमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या  फायली तातडीने निकालात निघू लागल्या आहेत, सर्वसामान्य जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवकही आमदार असल्याप्रमाणे सत्ता वाकवत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जोरदार पाठबळ असल्याने सातारा जिल्ह्यात भाजपची अशी वेगाने मुसंडी सुरु आहे. 

या पार्श्‍वभूमीवर संभाव्य लोकसभा व विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी मोठी खेळी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार असलेल्या छत्रपती उदयनराजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावून देवेंद्रपंतांनी  राष्ट्रवादीच्या कुटुंबकबिल्यात हलकल्लोळ माजवला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या खासदाराचे कौतुक करताना मुख्यमंत्र्यांनी सातारा जिल्ह्याच्या अस्मितेचा व जिव्हाळ्याचा विषय असलेल्या मेडिकल कॉलेजच्या जागेला लवकरच मंजुरी देत असल्याचे जाहीर करुन टाकले. उदयनराजेंच्या वाढदिवसाचे हे गिफ्टच म्हणावे लागेल. कारण त्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी मेडिकल कॉलेजच्या जागेला मंजुरीही देवून टाकली. वास्तविक पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना, अजित पवार उपमुख्यमंत्री व शशिकांत शिंदे पालकमंत्री असताना मेडिकल कॉलेजच्या जागेचा विषय मंजुरीच्या पातळीवर होता. मात्र, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रेयवादाच्या भांडणात (की कुणाच्या खासगी घेतलेल्या जागांना वाढीव भाव मिळावेत म्हणून!) मेडिकल कॉलेज लटकले. देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हे काम करुन दाखवले. त्यामुळे मेडिकल कॉलेजचे श्रेय घेण्यास भाजपची मंडळी मागे पुढे पाहणार नाहीत. सातारा जिल्ह्यातील जनतेला विशेषत: नव्या पिढीच्या मनात भाजपचे स्थान मिळवण्यासाठी झालेले हे फार मोठे काम आहे, असे मानावे लागेल. मेडिकल कॉलेजच्या जागेच्या मंजुरीवर ज्यादिवशी फडणवीसांनी स्वाक्षरी केली त्याच्याच दुसर्‍या दिवशी त्यांनी भाजपचे नेते व पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला. फडणवीसांची ही चाल सातारा जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांना व नेत्यांना पक्ष ताकद देतो हे दर्शवणारी आहे. पंढरपूर देवस्थानच्या माध्यमातून अतुल भोसले घरा घरात पोहोचत आहेत. त्यांच्या क्लिन प्रतिमेचा फायदा भाजपला होणार असल्याने त्यांना अधिक ताकद देवून मुख्यमंत्र्यांनी सातारा जिल्ह्यात भाजप वाढीसाठी मोठी चालना दिली आहे. डॉ. अतुल भोसले यांच्यासाठी राज्यमंत्रीपद ही मोठी संधी असून त्यानिमित्ताने त्यांचा विस्तार आता केवळ कराड व पंढरपूर पुरता मर्यादित राहिला नसून सातारा जिल्ह्यातील भाजपच्या विस्तारासाठी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांना कष्ट घ्यावे लागणार आहेत. 

राज्यात मराठा मोर्चांनी वातावरण ढवळून काढले आहे. भाजप मराठा समाजाच्या विरोधात आहे अशी जी चर्चा आहे  या चर्चेला छेद देण्यासाठीच मराठ्यांचे छत्रपती असलेल्या उदयनराजेंभोवती फडणवीसांनी जाळे टाकले आहे. उदयनराजेंच्या कोणत्याही शब्दाला मुख्यमंत्री ‘ना’ म्हणत नाहीत. सध्या विकास कामे असू देत किंवा बदल्या बढत्या असू देत उदयनराजेंचा शब्द मुख्यमंत्र्यांच्या दरबारी चालत आहे. उदयनराजे भाजपमध्ये आले तर लगतच्या चार विधानसभा मतदार संघामध्ये त्यांची जादू चालेल, अशी अटकळ फडणवीसांनी बांधली आहे.  एवढेच नाही तर उदयनराजे भाजपमध्ये आले तर अखंड मराठा समाज भाजपच्या पाठीशी येवू शकतो, असा फडणवीसांचा अंदाज आहे. छत्रपतीच आमच्याबरोबर आहे मग आम्ही मराठ्यांच्याविरोधात कसे? हे गणित त्यांना राज्यापुढे मांडायचे आहे. त्यामुळेच त्यांना वाजत गाजत भाजपमध्ये घेण्याची तयारी सुरु आहे. असे असले तरी भाजपच्या एका वजनदार मंत्र्याचा उदयनराजेंना पक्षात घेण्यास विरोध आहे. दुसरीकडे राजकीय खेळात तरबेज असलेल्या उदयनराजेंनी अद्याप ताकासतूर लागू दिलेला नाही.  जे मराठा कार्ड उदयनराजेंबाबत फडणवीसांनी वापरले आहे तेच त्यांनी डॉ. अतुल भोसले यांना राज्यमंत्रीपद देताना वापरले आहे. डॉ. अतुल भोसले हे पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष आहेत. विठोबा हा शेतकर्‍यांचा देव मानला जातो. सुमारे एक कोटी भाविक दरवर्षी आषाढी - कार्तिकीला पंढरपुरात असतात. बहुसंख्य शेतकरी समाज हा मराठा आहे. डॉ. अतुल भोसले यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देताना  हेच गणित फडणवीसांनी समोर ठेवले आहे. भाजपची मराठा विरोधी असलेली प्रतिमा पुसून काढण्यासाठी फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात व छत्रपतींच्या राजधानीत पुरेपूर शिरकाव केला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी फडणवीसांच्या या चाली धोक्याची घंटा आहे. मात्र, सत्ता नसूनही अजूनही सत्तेच्या गुर्मीत असलेल्या, कार्यकर्ते आल्यानंतर काचाही खाली न घेणार्‍या, अरे - कारेची भाषा करणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुभेदारांसाठी येणारा काळ सत्वपरिक्षेचा आहे. बालेकिल्ला म्हणून फाजील आत्मविश्‍वास बाळगणार्‍यांसाठी हा सावधानतेचा इशारा आहे.