कराड: पुढारी ऑनलाईन
भाजपाची महाजनादेश यात्रा सोमवारी कराडमध्ये दाखल झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित देशमुख यांचे पक्षात स्वागत केलं. फडणवीस यांनी यावेळी पत्रकार परिषेद घेतली. पत्रकारा परिषेदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. पाकच्या मुद्यावर बोलताना विचार करावा असा खोचक टोमणा फडणवीस यांनी पवारांना मारला.
शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी कोणतंही वक्तव्य करताना विचार केला पाहिजे. त्यांच्या वक्तव्याने भारताला फायदा होईल की पाकिस्तानला याचा विचार करायला हवा. मतांसाठी राजकारण करू नये, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.
तसेच, पाकिस्तानचं कौतुक केल्याने मुसलमान खूष होतील आणि मतदान करतील या भ्रमात त्यांनी राहू नये. भारतातील मुसलमान देशाभिमानी आहेत. पवारांच्या या वक्तव्यातून राष्ट्रवादीची मानसिकता कळते, असे सांगतानाच निवडणुका येतील आणि जातील. पण मतं घेण्यासाठी अशी वक्तव्ये करू नयेत, असा टोला फडणवीस यांनी पवारांना लगावला.
शरद पवार यांच्यासोबत फडवणीस यांनी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रसे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही टीकास्त्र सोडले. सध्या २५ टक्के रोजगार निर्मिती महाराष्ट्रात झाली आहे. पृथ्वीराज चव्हाण हे खोटी माहिती देत आहेत. चव्हाणांनी सांगाव की कलम ३७० च्या विरोधात का? अशी विचारणाही फडवणीस यांनी यावेळी केली.
तसेच, यावेळी फडणवीस पूरपरिस्थीतीसंदर्भात म्हणाले, कोल्हापूर-सांगलीत पुरपरिस्थिती ओढवली होती. भविष्यातील संभाव्य पूरपरिस्थती नियंत्रणाच्या अनुषंगाने उपाययोजना हाती घेण्यात येणार आहे. आपत्तीच्या काळातही टिकून राहिलं अशा पायाभूत सुविधा उभ्या करण्याचं काम करणार आहे. जागतिक बँकेचे पथक येऊन गेले आहे. त्यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले आहे.
रस्ते, वीज पुरवठा आणि पुराच्या पाण्याचं व्यवस्थापन करणारे नियोजन या गोष्टींवर भर दिला जाणार आहे. पूरग्रस्त भागातील पाणी दुष्काळग्रस्त भागात पोहोचवण्याच काम करता येणं शक्य आहे. हे पाणी कोणत्याही राज्याच्या हिश्शाचं असणारं नाही. ते काम राज्य सरकार हाती घेत आहोत. आघाडीच्या काळात महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर होता. असे त्यांनी यावेळी सांगितले.