Tue, Sep 29, 2020 19:05होमपेज › Satara › सहापदरीकरण कामाचा दर्जा पुन्हा ऐरणीवर  

सहापदरीकरण कामाचा दर्जा पुन्हा ऐरणीवर  

Published On: Dec 29 2017 1:31AM | Last Updated: Dec 28 2017 10:59PM

बुकमार्क करा
सातारा  : प्रतिनिधी

शिवराज पेट्रोलपंपाशेजारील उड्डाणपूल खचल्याच्या घटनेने एकूणच सहापदरीकरणाच्या कामकाजाबाबत पुन्हा एकदा संताप व्यक्‍त होवू लागला आहे. ठिकठिकाणी सर्व्हीस रोड, गटार, भुयारीमार्ग यासारखी कामे अपूर्ण ठेवली असतानाच झालेली कामेही निकृष्ट असल्याचे समोर आले आहे. बुधवारी उड्डाणपुलाचा भराव खचल्याने अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. 

जिल्ह्यात सुरु असलेल्या सहापदरीकरणाच्या कामांमुळे अनेक ठिकठिकाणी तक्रारींचाच पाढा वाचला जात आहे. उड्डाणपूल, सर्व्हीस रोड, गटारे, भुयारी मार्ग, सर्व सोयीनीयुक्त शौचालयाची उभारणी महामार्गाच्या दोन्ही बाजूला करावी, ठिकठिकाणी मार्गदर्शक फलक उभारावेत. महामार्गाच्या रूंदीकरणात जेवढी झाडे तोडण्यात आली तेवढीच झाडे प्राधिकरणाने इतरत्र लावावीत. महामार्गाचे खडीकरण, डांबरीकरण मजबूत व दर्जेदार असावे, अशा मागण्या महामार्गाच्या परिसरातील असणार्‍या गावातील ग्रामस्थांनी वेळोवेळी केल्यानंतरही त्याकडे संबंधित यंत्रणेने डोळेझाकच केली. जनतेच्या  कोट्यवधी रूपयांचा चुराडा निकृष्ट कामातून होत असल्याचा आरोप वाहनधारकामधून उपस्थित केला जात आहे. 

जमिनीत पाणी घुसून शेतकर्‍यांचेही नुकसान

बर्‍याच ठिकाणी पाण्याचा प्रवाह जाण्यासाठी जागा सोडली नसल्याने पाणी महामार्गावर किंवा शेतकर्‍यांच्या शेतात साचेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे पुलाच्या शेजारील जमिनीत पाणी साठून जमिनी नापिक होत आहेत. महामार्गाच्या कामासाठी खडी व मुरूमाची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. खडी वाहतूक करणार्‍या डंपरमधून रस्त्यावर खडी व मुरूमाचे दगड मोठ्या प्रमाणात पडत आहेत. त्यामुळे हे दगड उडून वाहनधारकांना लागत आहेत. रस्त्यावर पडलेल्या दगड व मुरूमामुळे अपघाताचेही प्रमाण वाढले आहे. अनेकदा दुचाकीस्वार या खडीवरुन घसरुन अपघात घडल्याच्या घटनाही ताज्या आहेत. ही कामे अनेकांना यमसदनी धाडण्याची व्यवस्था करत आहे का? असा संतप्त सवाल वाहनचालकांतून उपस्थित केला जात आहे.