Tue, Sep 29, 2020 10:36होमपेज › Satara › सातारा : जावळी तालुक्‍याला हिरवाईची झालर 

सातारा : जावळी तालुक्‍याला हिरवाईची झालर 

Last Updated: Aug 05 2020 7:04PM
कुडाळ : पुढारी वृत्‍तसेवा 

जावळी तालुक्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून, श्रावण महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जावळी तालुक्यातला निसर्ग हिरव्याकंच सौंदर्याने नटला आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी जणू हिरवाईचा शालू नेसला आहे. जावळी तालुक्यातील अंधारी या उंच डोंगरावरून महाबळेश्वर तालुक्यातून वाहत आलेल्‍या कोयना नदीचे विहंगमय दृश्य मनाला मोहवून टाकत आहे. तर परिसरातील हिरवीगार निसर्गसंपदा पर्यटकांना खुणावत आहे. मात्र कोरोनाच्या संकटामुळे ही पर्यटनस्‍थळे पर्यटकांविना सुनीसुनी भासत आहेत.  

गेल्या आठ दिवसांपासून जावळी, महाबळेश्वर, कोयना बॅक वॉटर, बामनोली परिसरामध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. येथील उंच पर्वत शिखरांमधून वाहणारे पांढरे शुभ्र लहान-मोठे धबधबे, रस्त्यावरून खळाळत वाहणारे पाणी, आकाशातून डोंगर माथ्यावर आलेले आलेले दाट धुके तर हिरव्यागार डोंगरावर पांढराशुभ्र धुक्याची पसरलेली चादर ही सर्व निसर्गाची अल्‍हाददायक रूप मनाला प्रसन्न करतात. मात्र यंदा साऱ्या मानव जातीवर आलेल्‍या कोरोनाच्या संकटामुळे निसर्ग प्रेमी तसेच पर्यटकांनी या पर्यटन स्‍थळांपासून पाठ फिरवल्‍याचे दिसत आहे. मात्र अशाही परिस्‍थितीत स्‍वर्ग सुंदर निसर्गाचा हिरवाकंच नजारा डोळ्यात साठवण्यासाठी स्‍थानिक नागरिक आवर्जुन विविध स्‍थळांना भेटी देत असल्‍याचे चित्र दिसत आहे. 

 "