Sat, Aug 08, 2020 14:39होमपेज › Satara › सज्जनगड पायरी मार्गाचे अस्तित्व धोक्यात

सज्जनगड पायरी मार्गाचे अस्तित्व धोक्यात

Published On: Apr 29 2018 2:07AM | Last Updated: Apr 28 2018 8:57PMपरळी : सोमनाथ राऊत

छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यात दाखल केलेला परळीचा किल्ला समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने सज्जनगड झाला. इतिहास काळात या गडावर जाण्यासाठी परळी गावातूनच मार्ग होता. ज्या मार्गावर छत्रपती, समर्थांची तसेच हजारो शूर मावळे व समर्थ भक्तांची पायधूळ झडली तो पायरी मार्ग आता काळाच्या ओघात  हरवत चालला आहे. या मार्गाची दुरूस्ती करण्याची वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत वन विभागाने पुढाकार घेण्याची मागणी होत आहे. 

ठोसेघर धबधबा, कास पुष्प पठार, भांबवलीचा वजराई धबधबा या परिसराचा विकास करण्यासाठी वन विभागाने पुढाकार घेतला. प्रतापगडासाठीही वन विभागाने पुढाकार घेतला. मात्र, सज्जनगड किल्ल्याच्या दुरूस्तीसाठी वन विभाग गप्प का? असा प्रश्‍न इतिहासप्रेमी, संशोधक, पर्यटक उपस्थित करत आहेत.

सज्जनगडावर जाण्यासाठी पूर्वी परळी गावातूनच वाट होती. इतिहास काळात या मार्गाचाच वापर केला जात असे. ‘जय जय रघुवीर समर्थ’चा जयघोष करत समर्थ रामदास स्वामी याचमार्गे भिक्षेसाठी परळी खोरे पादाक्रांत करत उरमोडीच्या डोहातून मोठमोठ्या हंड्यातून याच मार्गे गडावर पाणी नेले जाई. 1950 साली समर्थ सेवा मंडळाची स्थापना झाल्यानंतर प.पू. श्रीधर स्वामी यांनी या मार्गावर चुनखडी व दगडातून 800 पायर्‍या बांधल्या. काळाच्या ओघात गजवडीमार्गे गडावर जाण्यासाठी गाडीरस्ता करण्यात आला. गडावर वाहनतळ झाले. त्यामुळे जुन्या पायरी मार्गाकडे दुर्लक्ष झाले आहे. पायरी मार्गावर विसाव्यासाठी बांधलेले शेड आता नावापुरते राहिले आहे.

या मार्गावरून आजही परळी व परिसरातील भाविक गडावर जातात. त्यामुळे या मार्गाचा वापर अद्यापही सुरू आहे. तरीदेखील गाडी रस्त्यांमुळे या मार्गावरील वर्दळ कमी झाल्याने या मार्गावरील विसावा शेडचा पत्रा व लोखंडी अँगल चोरीस गेले आहेत. दुरूस्तीच्या अभावामुळे अनेक पायर्‍या गायब झाल्या आहेत. काही ठिकाणी तर पायर्‍याअभावी हा मार्ग धोकादायक झाला आहे. आजही परळी परिसरातील काही गावातील शाळांच्या सहली याच मार्गे गडावर जात असतात. दासनवमी उत्सव काळात परिसरातील गावांमधून शेकडो भाविक यामार्गे गडावर जात असतात. दासनवमी उत्सव काळात परळी ग्रामपंचायतीतर्फे या मार्गावर विद्युत रोषणाई केली जाते. त्यामुळे या मार्गाची दुरूस्ती करणे आवश्यक आहे. तसेच ही दुरूस्ती करतानाच या मार्गावर पिण्याच्या पाण्याची सोय, धोकादायक ठिकाणी रेलिंग उभारणे आवश्यक आहे. तसे घडले तरच छत्रपती, समर्थांची पायधूळ झडलेल्या या मार्गाचे जतन होईल. हा मार्ग वन विभागाच्या ताब्यात येत असल्याने वन विभागानेच या कामासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे. 

वनमंत्र्यांशी चर्चा करणार : आ. शिवेंद्रराजे भोसले

सज्जनगड पायरी मार्ग हा ऐतिहासिक आहे. पर्यटनस्थळे सुशोभिकरणासाठी वन विभाग निधी उपलब्ध करून देत आहे, हे कौतुकास्पद आहे. मात्र, जुनी इतिहासकालीन पर्यटनस्थळे दुर्लक्षित करून चालणार नाहीत. ऐतिहासिक पायरी मार्गाचे जतन करणे आवश्यक आहे. या मार्गावर पाणपोई, बैठक व्यवस्था,  वृक्ष लागवड, पायर्‍यांची दुरूस्ती, वन्यप्राणी, पक्षी यांचे फलक लावून या मार्गाचे सौंदर्य वाढवले पाहिजे. मी स्वत: या गोष्टींचा पाठपुरावा करणार असून वनमंत्र्यांबरोबर बैठकीचे नियोजन करणार असल्याची माहिती आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.